
दुबई : भारतीय टी-२० संघातील अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल ही सलामीवीर जोडी आग आणि बर्फासारखी असल्याचे कौतकोद्गार भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने काढले.
आशिया चषक स्पर्धेत रविवारी पाकिस्तानने भारतासमोर १७२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. अभिषेक आणि शुभमन या जोडीने सलामीला १०५ धावांची भागीदारी केल्याने भारताला हा सामना जिंकणे सोपे गेले. अभिषेक आणि शुभमन ही जोडी १० वर्षांपासून एकत्र खेळत आहे अभिषेकने या सामन्यात ३९ चेंडूंत ७४ धावांची वादळी खेळी खेळत स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. तर गिलने २८ चेंडूंत ४७ धावा चोपल्या, असे सूर्या म्हणाला.
अभिषेक आणि सूर्यकुमार ही जोडी आग आणि बर्फासारखी आहे. दोघांतील समन्वय अप्रतिम आहे. त्याचा फायदा भारतीय संघाला होत आहे. एक फलंदाज फटकेबाजी करत होता आणि दुसरा स्ट्राईक रोटेट करत होता. या सामन्यात भारतीय संघाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. त्याप्रमाणे सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली, असे सूर्यकुमार यादव म्हणाला. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये रविवारी रात्री उशीरा भारताने पाकिस्तानला ६ विकेट राखून पराभूत केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव प्रसारमाध्यमांशी बोलत होता.
पंजाबच्या १२ वर्षांखालील संघापासून ही जोडी एकत्र खेळत आहे. ते दोघे एकमेकांना चांगलेच ओळखतात. त्यांना एकमेकांचा खेळ माहित आहे. तसेच प्रतिस्पर्धी संघाला कळण्याआधीच ते आपल्या धोरणात बदल करतात, असे सूर्या म्हणाला.
या दुकलीच्या फटक्यांकडे पाहिल्यास अभिषेक हा क्षेत्ररक्षकांच्या वरून फटके मारण्यास पसंती देतो. तर गिल हा क्षेत्ररक्षकांमधून फटके मारतो. जर का अभिषेकने आक्रमकता दाखवली, तर गिल स्ट्राईक रोटेट करतो. सलामीच्या जोडीमध्ये समन्वय असणे खूप गरजेचे असते. अभिषेक आणि शुभमन यांच्यात तो आहे. मैदानाबाहेरही त्यांच्यात चांगली मैत्री आहे. बऱ्याच वेळा त्यांना काही सांगायची गरजच पडत नाही. एखादी चोरटी धाव घ्यायची असेल तर त्यासाठी फक्त नजर पुरेशी असते. जेव्हा हे दोघे फलंदाजी करतात करतात तेव्हा त्यांच्यात मैत्री दिसून येते, असे कर्णधाराने सांगितले.
धावा कशा करायच्या हे शुभमनला माहीत आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने धोका कमी पत्करला. त्याने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला, असे सूर्यकुमार म्हणाला.
आशिया चषक स्पर्धेच्या सुपर -४ लढतीत भारताने पाकिस्तानला धूळ चारली. स्पर्धेत दुसऱ्यांदा भारताने पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजले. १४ सप्टेंबरला झालेल्या पहिल्या लढतीत भारताने पाकिस्तानला एकतर्फी पराभूत केले होते. त्यावेळी हस्तांदोलनावरून वाद निर्माण झाला होता. २१ सप्टेंबरला झालेल्या सामन्यातही भारतीय संघातील खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने १०५ धावांची भागीदारी करत भारताला दमदार सुरुवात करून दिली. मात्र ही जोडी बाद झाल्यावर भारताची धावगती मंदावली. कर्णधार सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडता आला नाही. तिलक वर्माने नाबाद ३० धावांची खेळी खेळत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने १८.५ षटकांत ४ फलंदाज गमावून विजयी लक्ष्य गाठले.
अभिषेकमध्ये प्रचंड गुणवत्ता - अश्विन
पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्माने केलेल्या झंझावाती खेळीवर भारताचा माजी खेळाडू रविचंद्रन अश्विनने त्याचे कौतुक केले आहे. अश्विनने म्हटले आहे की हा युवा फलंदाज भारतासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज बनेल. त्याच्यात प्रचंड क्षमता आहे. युवराज सारखे गुण त्याच्या फलंदाजीत आहेत, असे अश्विन म्हणाला.
६ विकेट राखून भारताचा वरचष्मा
आशिया चषक स्पर्धेच्या सुपर -४ मधील लढतीत भारताने रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ६ विकेट राखून धूळ चारली. स्पर्धेत दुसऱ्यांदा भारताने पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजले आहे. या सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माने अर्धशतक झळकावले. शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांनीही भारताच्या विजयात हातभार लावला. तत्पूर्वी शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना आपल्या ताब्यात ठेवले.