Paris Olympics 2024: मनिकामुळे महिलांची आगेकूच

टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला संघाने मनिका बत्राच्या चमकदार कामगिरीच्या बळावर उपउपांत्यपूर्व सामन्यात (राऊंड ऑफ १६) रोमानियावर ३-२ अशी मात केली.
Paris Olympics 2024: मनिकामुळे महिलांची आगेकूच
Twitter
Published on

पॅरिस : टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला संघाने मनिका बत्राच्या चमकदार कामगिरीच्या बळावर उपउपांत्यपूर्व सामन्यात (राऊंड ऑफ १६) रोमानियावर ३-२ अशी मात केली. याबरोबरच भारताने प्रथमच या प्रकारात अंतिम ८ संघांत स्थान मिळवले असून ७ ऑगस्ट रोजी त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.

भारताचे दोन्ही संघ यंदा प्रथमच सांघिक प्रकारात सहभागी झाले आहेत. एकेरी व मिश्र प्रकारात भारतीय खेळाडूंना पदक जिंकण्यात अपयश आले. त्यामुळे सांघिक प्रकारात भारतीय संघाकडून अपेक्षा आहेत. त्यात महिला संघाने सोमवारी दणक्यात सुरुवात करताना जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या रोमानियावर ३-२ असा विजय मिळवला. भारताकडून पहिल्या गेममध्ये दुहेरीत श्रीजा अकुला-अर्चना कामत यांच्या जोडीने एडिना डिकोनू व एलिझाबेटा समारा यांच्याविरुद्ध ११-९, १२-१०, ११-७ अशी बाजी मारली. मग एकेरीच्या लढतीत मनिकाने बर्नेड सोक्सला ११-५, १-७, ११-७ असे नेस्तनाबूत केले. त्यामुळे भारताने २-० अशी आघाडी मिळवली.

तिसऱ्या गेममध्ये मात्र रोमानियाच्या समाराने श्रीजाला ३-२ असे, तर बर्नेडने अर्चनाला ३-१ असे पराभूत करत सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे सामना निर्णायक पाचव्या लढतीत गेला. तेथे मग मनिकाने अनुभवाच्या बळावर एडिनाला ११-५, ११-९, ११-९ अशी तीन गेममध्येच धूळ चारून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. आता भारतासमोर जर्मनी किंवा अमेरिकेचे आव्हान असेल.

logo
marathi.freepressjournal.in