नोएडा : अफगाणिस्तान-न्यूझीलंड यांच्यात ग्रेटर नोएडा येथील स्टेडियमवर होणारी एकमेव कसोटी पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आली. पाचव्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करूनही पाऊस तसेच ओलसर खेळपट्टीमुळे खेळ सुरू करणे शक्य न झाल्याने उभय संघांतील लढत रद्द झाली. गेल्या २६ वर्षांत प्रथमच असे घडले.
न्यूझीलंडचा संघ सध्या अफगाणिस्तान व श्रीलंका दौऱ्यावर असून आता ते श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी सामने खेळणार आहेत. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडचा संघ ३ कसोटींसाठी भारतात येणार आहे. मात्र त्यापूर्वी अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंविरुद्ध न्यूझीलंडचा चाचपणी करण्याची संधी होती.
मात्र पावसाने त्यांचा हिरमोड केला. दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांनीही याविषयी नाराजी दर्शवली. यापूर्वी १९९८मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आली होती. एकंदर पाऊस अथवा अन्य कारणास्तव नाणेफेकीविनाच रद्द होणारी ही आठवी कसोटी ठरली.