Afghanistan vs Australia: ऑस्ट्रेलियाला अफगाणी तडाखा!

T20 World Cup: गुलबदीनच्या प्रभावी माऱ्यामुळे कांगारूंवर २१ धावांनी सरशी, नवीन, गुरबाझ, झादरानही चमकले; कमिन्सची हॅटट्रिक व्यर्थ
Afghanistan vs Australia: ऑस्ट्रेलियाला अफगाणी तडाखा!
Twitter

किंग्जटाऊन : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी जगभरातील तमाम चाहत्यांना अफगाणिस्तानचा ऐतिहासिक एल्गार पाहायला मिळाला. सुपर-८ फेरीतील ‘करो या मरो’ लढतीत ऑस्ट्रेलियाला त्यांनी अफगाणी तडाखा देताना २१ धावांनी यश संपादन केले. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानचा हा पहिलाच विजय ठरला. ३३ वर्षीय वेगवान गोलंदाज गुलबदीन नैब (२० धावांत ४ बळी) या विजयाचा शिल्पकार ठरला.

किंग्सटाऊन येथील अर्नोस वॅले मैदानावर झालेल्या या लढतीत १४९ धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानने १९.२ षटकांत १२७ धावांत गुंडाळले. अझमतुल्ला ओमरझाईच्या गोलंदाजीवर ॲडम झाम्पाचा मोहम्मद नबीने झेल घेतला आणि संपूर्ण अफगाण संघाने तसेच त्यांच्या जगभरातील चाहत्यांनी एकच जल्लोष केला. वेगवान गोलंदाज नवीन उल हक तसेच रहमनुल्ला गुरबाझ आणि इब्राहिम झादरान यांची सलामी जोडी यांनाही या विजयाचे श्रेय जाते. आता २५ जून रोजी अफगाणिस्तानची बांगलादेशशी गाठ पडणार असून त्यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाला नमवले, तर अफगाणिस्तानला प्रथमच विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याची सुवर्णसंधी असेल.

सुपर-८ फेरीतील पहिल्या गटातील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ६ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारली. गुरबाझ (४९ चेंडूंत ६०) व झादरान (४८ चेंडूंत ५१) यांनी ९५ चेंडूंत ११८ धावांची सलामी नोंदवली. त्यावेळी अफगाणिस्तान सहज १६० ते १७० धावा करेल, असे वाटले. मात्र मार्कस स्टॉयनिसने गुरबाझचा अडसर दूर केला व त्यांची फलंदाजी घसरली. त्यानंतर अनुभवी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सलग दुसरी हॅटट्रिक साकारताना २८ धावांत ३ बळी मिळवले. त्याने रशिद खान, करिम जनत व गुलबदीन यांना बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना नवीनने पहिल्याच षटकात ट्रेव्हिस हेडला (०) माघारी पाठवले. त्यानेच मिचेल मार्शलाही (१२) जाळ्यात अडकवले. आठव्या षटकात गुलबदीनचे गोलंदाजीसाठी आगमन झाले व त्याने सामन्याचा नूरच पालटला. गुलबदीनने स्टॉयनिस (११) व टिम डेव्हिड (२) यांना बाद केले. ग्लेन मॅक्सवेल मात्र पुन्हा एकदा त्यांच्या मार्गात आला. मॅक्सवेलने ४१ चेंडूंत ५९ धावांची झुंज दिली. गुलबदीननेच १५व्या षटकात त्याचाही अडसर दूर केला. मग कमिन्सचा (३) त्रिफळा उडवून गुलबदीनने अफगाणिस्तानचा विजय जवळपास पक्का केला. अखेर झाम्पा बाद झाला व अफगाणिस्तानने एकच जल्लोष केला. गुलबदीनने चार, तर नवीनने तीन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

> अफगाणिस्तान : २० षटकांत ६ बाद १४८ (रहमनुल्ला गुरबाझ ६०, इब्राहिम झादरान ५१; पॅट कमिन्स ३/२८) विजयी वि.

> ऑस्ट्रेलिया : १९.२ षटकांत सर्व बाद १२७ (ग्लेन मॅक्सवेल ५९; गुलबदीन नैब ४/२०, नवीन उल हक ४/१२)

> गुलबदीन नैब: २० धावांत ४ बळी

> ऑस्ट्रेलियाविरुद्ध यापूर्वी ४ एकदिवसीय व १ टी-२० लढत गमावल्यावर अखेर सहाव्या प्रयत्नात अफगाणिस्तानने पहिला विजय मिळवला.

> सलग ८ टी-२० सामने जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला. या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने ५, तर त्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३, असे सलग ८ सामने जिंकले होते.

> कमिन्स हा टी-२० विश्वचषकात सलग दोन हॅटट्रिक नोंदवणारा पहिलाच गोलंदाज ठरला. कसोटी प्रकारात वासिम अक्रम यांनी सलग दोन कसोटींमध्ये हॅटट्रिक घेतली आहे.

‘त्या’ पराभवाचा वचपा

भारतात २०२३मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला ३ गडी राखून नमवले होते. वानखेडे स्टेडियमवर ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या त्या लढतीत २९२ धावांचा पाठलाग करताना कांगारूंची एकवेळ ७ बाद ९१ अशी स्थिती होती. मात्र मॅक्सवेलने द्विशतक साकारून अशक्यप्राय विजय साकारला व पुढे जाऊन विश्वचषकही उंचावला. अफगाणिस्तानने रविवारी टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यावर सगळीकडे त्यांनी एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा वचपा घेतल्याचीच चर्चा सुरू असून आता त्यांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताचे सहाय्य अपेक्षित आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाचे मुख्यालय असलेल्या खोस्त प्रांतात तमाम चाहत्यांनी रस्त्यावर येत ऑस्ट्रेलियावरील विजयाचा जल्लोष केला. अफगाणिस्तानमधील विविध ठिकाणी दिवसभर असेच चित्र दिसत होते.

रशिद खान, अफगाणिस्तानचा कर्णधार

वानखेडेवरील पराभवाच्या रात्री मी झोपू शकलो नव्हतो. कारण तो पराभव जिव्हारी लागणारा होता. आमच्या उपांत्य फेरीच्या आशा त्यावेळी संपुष्टात आल्या. त्याच वेळी ऑस्ट्रेलियाला भविष्यात लवकरच विश्वचषकात नमवण्याचा निश्चय केला. हा विजय फार कायम स्मरणात राहील. संपूर्ण संघ तसेच देश या विजयाचा जल्लोष करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in