"त्याचे म्हणणे खरे करुन दाखवले" ब्रायन लाराचा उपांत्य फेरीतील अंदाज खरा ठरविल्यानंतर राशिद नेमकं काय म्हणाला?

अफगाणिस्तानचा संघ दमदार कामगिरी करेल असे तर सर्वांचेच मत होते. पण, हा संघ उपांत्य फेरीत धडकेल असा अंदाज वर्तवायला कोणी धजावत नव्हते.
"त्याचे म्हणणे खरे करुन दाखवले" ब्रायन लाराचा उपांत्य फेरीतील अंदाज खरा ठरविल्यानंतर राशिद नेमकं काय म्हणाला?

बांगलादेशचा ८ धावांनी पराभव करत अफगाणिस्तानने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आणि थेट उपांत्य फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, पाकिस्तान असे माजी विश्वविजेते दिग्गज संघ एकामागून एक स्पर्धेबाहेर पडत असताना अफगाणिस्तानने सेमीफायनलमध्ये धडक मारुन सर्वांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे.

विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी अनेक माजी खेळाडू, कर्णधार कोणते चार संघ उपांत्य फेरीत धडकतील असा अंदाज वर्तवत होते. अफगाणिस्तानचा संघ दमदार कामगिरी करेल असे तर सर्वांचेच मत होते. पण, हा संघ उपांत्य फेरीत धडकेल असा अंदाज वर्तवायला कोणी धजावत नव्हते. अशात ज्या वेस्टइंडिजमध्ये विश्वचषक सुरू आहे, त्याच देशाचा माजी आणि महान खेळाडू ब्रायन लाराने मात्र अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत धडकेल असा अंदाज वर्तविला. हा अंदाज वर्तवणारा लारा एकमेव होता. त्यावेळी सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. तथापि, आता अफगाणिस्तानने आपल्या शानदार कामगिरीने ब्रायन लाराचे म्हणणे खरे करुन दाखवले आहे.

ब्रायन लाराचा अचूक अंदाज

बांगलादेश विरुद्धचा सामना संपल्यानंतर ब्रायन लाराच्या याच अचूक अंदाजाबाबत अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानला विचारण्यात आले. तेव्हा, 'आम्ही त्याचे म्हणणे खरे करुन दाखवले' असे राशिद म्हणाला. “हे अविश्वसनीय आहे. ब्रायन लारा हा एकमेव माणूस होता ज्याने आम्हाला उपांत्य फेरीत ठेवले होते आणि आम्ही तो योग्य असल्याचे सिद्ध केले. आम्ही त्याला वेलकम पार्टीत भेटलो होतो, तेव्हा आम्ही तुला निराश करणार नाही...आम्ही करुन दाखवू...तू बरोबर आहेस हे सिद्ध करू, असे मी त्याला सांगितले होते", असेही राशिद म्हणाला.

हे स्वप्नासारखं...

"एक संघ म्हणून हे आमच्यासाठी स्वप्नासारखं आहे. न्यूझीलंडला हरवल्यानंतर आमचा विश्वास दुणावला होता. हे अविश्वसनीय आहे. माझ्या भावनांचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आमच्या या मोठ्या यशाबद्दल मायदेशी प्रत्येकजण खूप खूप आनंदी असेल हे मात्र निश्चित. मायदेशातील लोकांना आनंद द्यायचा, हीच आमची चर्चाही झाली होती. प्रत्येकाने त्याची जबाबदारी सुरेखपणे पार पाडली" रशीद म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in