
अफगाणिस्तानने यजमान झिंबाब्वेवर पहिल्या वन-डे सामन्यात ६० धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १२० चेंडूंत ९४ धावा करणाऱ्या अफगाणिस्तानच्या रहमत शाहला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
झिंबाब्वेने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. अफगाणिस्तानने पाच बाद २७६ धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना झिंबाब्वेचा संघ २१६ धावांत गारद झाला. अफगाणिस्तान विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात २०१४पासून पाच वन-डे सीरिज खेळविण्यात आल्या. अफगाणिस्तानने या पाचही मालिका जिंकल्या.
दुसरा एकदिवसीय सामना हा सोमवारी ७ जून रोजी खेळविण्यात येणार आहे. झिंबाब्वेसमोर हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखण्याचे आव्हान असणार आहे. दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न राहील.
वर्ल्डकप सुपर लीग
गुणतालिकेत मोठी झेप
अफगाणिस्तानने यासह वर्ल्डकप सुपर लीग पॉइंट्सटेबलमध्ये मोठी झेप घेतली. अफगाणिस्तान गुणतािलकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला. आहे. अफगाणिस्तानने १० सामन्यांपैकी आठ सामन्यांत विजय मिळविला. अफगाणिस्तानच्या नावे ८० गुण आहेत. अफगाणिस्तानने या कामगिरीमुळे भारत आणि वेस्ट इंडिजला मागे टाकले. भारताचे ७९ आणि विडिंजचे ८० गुण आहेत. बांगलादेश अव्वल स्थानी आहे. बांगलादेशने १८ सामन्यांपैकी १२ सामन्यांत विजय मिळविला. दुसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंडने १५ पैकी नऊ सामने जिंकले आहेत.