भारतीय फुटबॉल संघापुढे अफगाणिस्तानचे आव्हान; विश्वचषकाच्या पात्रतेसाठी आज विजय आवश्यक

ब-गटात समावेश असलेल्या भारतीय संघाला आतापर्यंतच्या दोन सामन्यांत एक विजय व एक पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय संघ सध्या गटात ३ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. मात्र एका गटातून आघाडीचे दोनच संघ आगेकूच करणार आहेत.
भारतीय फुटबॉल संघापुढे अफगाणिस्तानचे आव्हान; विश्वचषकाच्या पात्रतेसाठी आज विजय आवश्यक

अभा (सौदी अरेबिया) : सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय फुटबॉल संघ गुरुवारी मध्यरात्री फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील दुसऱ्या टप्प्यात अफगाणिस्तानशी दोन हात करणार आहे. २०२६च्या फि‌फा विश्वचषकाला पात्र ठरण्यासाठी भारताला ही लढत जिंकणे अनिवार्य आहे.

ब-गटात समावेश असलेल्या भारतीय संघाला आतापर्यंतच्या दोन सामन्यांत एक विजय व एक पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय संघ सध्या गटात ३ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. मात्र एका गटातून आघाडीचे दोनच संघ आगेकूच करणार आहेत. त्यामुळे कुवैत आणि कतार यांच्याविरुद्धची लढतही भारतासाठी निर्णायक ठरेल. जूनमध्ये भारतीय संघ या दोन्ही संघांविरुद्ध परतीच्या लढती खेळणार आहे. प्रशिक्षक इगॉर स्टिमॅच यांनीसुद्धा अफगाणिस्तानविरुद्धची लढत जिंकून पुढील आव्हानांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे सांगितले.

भारताने पहिल्या सामन्यात कुवैतला १-० असे नमवले होते. त्यानंतर कतारकडून ०-३ असा पराभव पत्करला. आता अफगाणिस्तानशी भारतीय संघ पहिल्या टप्प्यातील लढत खेळणार आहे. त्यानंतर २६ मार्च रोजी आसाम येथे भारत-अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टप्प्याचा सामना रंगेल. भारतीय संघाची मदार प्रामुख्याने संदेश झिंगणे, छेत्री यांच्यासह गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू याच्यावर आहे.

हे महत्त्वाचे

  • दुसऱ्या टप्प्यात ३६ संघांची ९ गटांत विभागणी करण्यात आली आहे.

  • त्यांपैकी प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ पात्रतेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरतील.

  • या १८ संघांची मग पुन्हा ३ गटांत (एका गटात सहा संघ) विभागणी केली जाईल.

  • या तीन गटांतील आघाडीचे दोन संघ थेट फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरतील. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघांना आणखी एक संधी मिळेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in