टी-२० सामन्यांत आफ्रिका आघाडीवर,भारताचा पराभव

दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली
टी-२० सामन्यांत आफ्रिका आघाडीवर,भारताचा पराभव

बाराबती स्टेडियमवर रविवारी दक्षिण आफ्रिकेने भारतावर चार गडी राखून विजय मिळवत पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. भारताने विजयासाठी दिलेले १४९ धावांचे माफक आव्हान दक्षिण आफ्रिकेने १८.२ षटकांत सहा गडी बाद १४९ धावा करीत साध्य केले. सामनावीर हेनि्रक क्लासेन (४६ चेंडूंत ८१ धावा) याने विजयात मोलाचा वाटा उचलला. कर्णधार टेंबा बावुमाने (३० चेंडूंत ३५ धावा) मोलाचे योगदान दिले. भुवनेश्वर कुमारने १३ धावांच्या मोबदल्यात चार बळी टिपले. युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सामन्यात विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने २९ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे भारताच्या विजयाची अंधुकशी आशा त्यावेळी पल्लवित झाली होती. त्यांनतर हेनरिक क्लासेनने सामना जिंकून देणारी खेळी केली. भुवनेश्वर कुमारने पॉवर प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का देताना रस्सी व्हॅन डर डुसेनचा (७ चेंडूंत १ धाव) त्रिफळा उडविला. त्याआधी, भुवनेश्वरने ड्वेन प्रिटोरियसला (५ चेंडूंत ४ धावा) झेलबाद केले, तर डावातील पहिल्या षटकांत रीझा हेंड्रिक्सला (३ चेंडूंत ४ धावा) त्रिफळाचीत केले. वेन पार्नेल याला (४ चेंडूंत १ धावा) त्याने अठराव्या षटकात त्रिफळाचीत केले.

दक्षिण आफ्रिका कर्णधार टेंबा बावुमाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० बळी घेणारा कगिसो रबाडा दक्षिण आफ्रिकेचा चौथा गोलंदाज ठरला. भारताने २० षटकांत ६ विकेट गमावून १४८ धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ४० तर दिनेश कार्तिक ३० धावा करून नाबाद राहिला. इशान किशनने ३४ धावांचे योगदान दिले.

logo
marathi.freepressjournal.in