१७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर इंग्लंडचा विजय

पहिल्या सामन्यात पाहुण्या संघाने १९.२ षट्कांत चार विकेट‌्स गमावून १६० धावा करीत १५९ धावांचे लक्ष्य गाठले.
१७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर इंग्लंडचा विजय

सामनावीर ठरलेला डावखुरा मध्यमगती गोलंदाज ल्यूक वुडची अचूक गोलंदाजी (२४ धावांत तीन विकेट‌्स) आणि ॲलेक्स हेल्स (४० चेंडूंत ५३ धावा) आणि हॅरी ब्रूक (२५ चेंडूंत नाबाद ४२ धावा) यांची शानदार फलंदाजी यामुळे इंग्लंडने १७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर विजय मिळविला. दौऱ्यात विजयाने सुरुवात करताना त्यांनी यजमानांचा सहा विकेट्सनी पराभव केला.

पाकिस्तान दौऱ्यातील सात सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या संघाने १९.२ षट्कांत चार विकेट‌्स गमावून १६० धावा करीत १५९ धावांचे लक्ष्य गाठले. ब्रूक्सने विजयी चौकार लगावला.

तीन वर्षांनंतर संघात पुनरागमन करताना ॲलेक्स हेल्सने शानदार खेळी केली. नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानने फलंदाजी करीत ७ बाद १५८ धावा केल्या. पाकिस्तानने पहिल्या १० षटकात ८७ धावा केल्या होत्या; पण मधल्या फळीला दमदार सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले.

सलामीवीर मोहम्मद रिझवान (४६ चेंडूंत ६८ धावा) आणि कर्णधार बाबर आझम (२४ चेंडूंत ३१ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. रिझवानने सहा चौकार आणि दोन षट्कार लगावले.

विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना सामन्यात सलामीवीर फिल सॉल्टची (१० चेंडूंत १० धावा) लवकर बाद झाला. त्याच्यासोबत सलामीला आलेला हेल्स टिकून राहिला. हेल्सने मलानसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३४ आणि डकेटसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली. चौथ्या विकेटसाठी ब्रुक आणि हेल्स यांच्यात झालेल्या ५५ धावांच्या भागीदारीने पाकिस्तानच्या विजयाच्या आशा मावळल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in