तब्बल ५२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'चक दे!' कांगारूंना पराभवाचा धक्का देत भारताची थाटात उपांत्यपूर्व फेरीत धडक

Paris Olympics 2024: भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे चक्रव्यूह भेदून काढले.
तब्बल ५२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'चक दे!' कांगारूंना पराभवाचा धक्का देत भारताची थाटात उपांत्यपूर्व फेरीत धडक
Twitter
Published on

Hockey: पॅरिस : भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे चक्रव्यूह भेदून काढले. कर्णधार हरमनप्रीत सिंगने पुन्हा एकदा केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३-२ असे पराभूत केले. या बरोबरच भारताने ब-गटातून दुसऱ्या स्थानासह थाटात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. भारताने ऑलिम्पिकमध्ये तब्बल ५२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला नमवण्याचा पराक्रम केला, हे विशेष.

राष्ट्रकुल सुवर्णपदक तसेच टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ऑस्ट्रेलियाला १९७२च्या ऑलिम्पिकपासून भारताने कधीच धूळ चारली नव्हती. त्यामुळे यंदाही कांगारूंचेच पारडे जड मानले जात होते. मात्र टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाला यावेळी इतिहास बदलायचाच होता. अभिषेकने १२व्याच मिनिटाला भारताचे खाते उघडले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने १३ आणि ३२व्या दोन गोल नोंदवून भारताची गोलसंख्या ३ केली. मुख्य म्हणजे हरमनप्रीतचा हा यंदाच्या ऑलिम्पिकमधील सहावा गोल ठरला. ऑस्ट्रेलियाकडून टॉम क्रेगने २५व्या मिनिटाला पहिला गोल केला. तर ५५व्या मिनिटाला ब्लेक गोव्हर्सने कांगारूंसाठी दुसरा गोल झळकावत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र भारताने उर्वरित ५ मिनिटे यशस्वीपणे बचाव करून ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधण्यापासून रोखले आणि थरारक विजय मिळवला.

भारताने पहिल्या मिनिटापासूनच आक्रमण करून यावेळी ऑस्ट्रेलियाला निष्प्रभ केले. या विजयानंतर भारतीय संघ ५ सामन्यांतील ३ विजय, १ बरोबरीच्या एकूण १० गुणांसह ब-गटात दुसऱ्या स्थानी आहे. बेल्जियम १२ गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे. ऑस्ट्रेलिया ५ सामन्यांतील ३ विजयांच्या ९ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे रविवार, ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतापुढे ग्रेट ब्रिटनचे आव्हान उभे ठाकू शकते. ब-गटातून बेल्जियम, भारत, ऑस्ट्रेलिया व अर्जेंटिना, तर अ-गटातून जर्मनी, नेदरलँड्स, ग्रेट ब्रिटन, स्पेन यांनी उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे.

ऑस्ट्रेलियासारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिल्याचे समाधान आहे. हा विजय आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. मात्र आमचे लक्ष्य अद्याप दूर आहे. उपांत्यपूर्व सामन्यासाठी अधिक जोमाने तयारी करू.

- हरमनप्रीत सिंग, भारताचा कर्णधार

> हरमनप्रीतने ५ सामन्यांत ६ गोल केले असून स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक गोव्हर्सने सात गोल झळकावले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in