पाणीपुरी नव्हे, मेहनतीने नशीब पालटले! प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी उलगडला जैस्वालचा ‘यशस्वी’पट

यशस्वी आणि एका पाणीपुरीवाल्याचे छायाचित्र चर्चेत असून, त्यामधील व्यक्ती यशस्वीचे वडील असल्याची अफवा सगळीकडे पसरली
पाणीपुरी नव्हे, मेहनतीने नशीब पालटले! प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी उलगडला जैस्वालचा ‘यशस्वी’पट

सचिन तेंडुलकरप्रमाणे क्रिकेटचे मैदान गाजवावे, हे स्वप्न उराशी बाळगून २०११मध्ये मुंबईत आलेला यशस्वी जैस्वाल आज प्रत्येक भारतीयाच्या मनात पोहोचला आहे. २१ वर्षीय यशस्वीने रविवारी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना धडाकेबाज शतक साकारले. मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडेवर झळकावलेल्या या शतकानंतर यशस्वीच्या संघर्षाची सगळीकडे चर्चा होत आहे. मात्र यशस्वीला मुलाप्रमाणे सांभाळणारे त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी याविषयीच्या सर्व कहाण्यांना मोडीत काढून पाणीपुरी नव्हे, तर कठोर मेहनतीच्या बळावर यशस्वीने त्याचे आणि कुटुंबाचेही नशीब पालटले आहे, असे ठाम मत व्यक्त केले.

“यशस्वीने कधीही स्वत:चा पाणीपुरीचा स्टॉल वगैरे लावला नाही. मुळात २०१३मध्ये मी त्याला पहिल्यांदा भेटलो, तेव्हापासून त्याने एकदाही पाणीपुरी विकलेली नाही. २०११मध्ये मुंबईत आल्यावर आझाद मैदानाच्या बाहेर उदरनिर्वाहासाठी म्हणून तो काही जणांकडे काम करायला जायचा. यावेळीच त्याने पाणीपुरी विकणे किंवा अन्य काही कामे केले. मात्र त्याच्या प्रगतीच्या मागे नेहमी गरिबीच्या बाजूने पाहणे चुकीचे आहे. त्याने केलेली मेहनत व कठोर परिश्रम यामुळे तो आयपीएलमध्ये खेळत आहे,” असे ज्वाला सिंग म्हणाले.

यशस्वी मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या काळ्यात त्याच्या काकांसह राहायचा. परंतु स्वत:चा क्रिकेटचा खर्च तसेच काकांनाही हातभार लागावा, या हेतूने त्याने काही काळ विविध स्टॉल्सवर जाऊन पाणीपुरी विकली. परंतु यशस्वीच्या वडिलांनी डिसेंबर २०१३मध्ये त्यांच्या मुलाला ज्वाला सिंग यांच्याकडे सुपूर्द केले आणि तेव्हापासून यशस्वीचा वेगळा प्रवास सुरू झाला.

ते’ यशस्वीचे वडील नव्हेच!

समाजमाध्यमांवर यशस्वी आणि एका पाणीपुरीवाल्याचे छायाचित्र चर्चेत असून, त्यामधील व्यक्ती यशस्वीचे वडील असल्याची अफवा सगळीकडे पसरली आहे. परंतु ज्वाला सिंग यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. “२०१८मध्ये यशस्वी काहीसा प्रकाशझोतात आल्यानंतर अनेक माध्यमांनी तो पाणीपुरी विकत असतानाचे छायाचित्र मिळवण्यासाठी माझ्याकडे आग्रह केला. त्यावेळी माझ्याच सांगण्यावरून यशस्वीने एका स्टॉलवर पाणीपुरी विकताना छायाचित्र काढले,” असे ज्वाला सिंग म्हणाले. यशस्वीचे वडील भूपेंद्र हे २०१३पासून फक्त चार वेळाच मुंबईत आले आहेत. ते उत्तर प्रदेशमधील भदोरी येथे राहत असून, त्यांचा रंगविक्रीचा व्यवसाय आहे.

सचिनच्या प्रेरणेने मुंबई गाठली!

बालपणापासूनच सचिनसारखी फलंदाजी करण्याचे यशस्वीचे लक्ष्य होते. त्याच्यासारखी फलंदाजी करणे तुला जमणार आहे का? असे कित्येक वेळा त्याचे वडील मुद्दामहून त्याला खिजवायचे. परंतु यशस्वीने मनाशी गाठ बांधली होती आणि अखेरीस आम्ही त्याला मुंबईत काकांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला, असे यशस्वीची आई कांचन म्हणाली.

यशस्वीचे पराक्रम

सर्वोत्तम खेळाडू : अंडर-१९ आशिया चषक (२०१८)

सर्वोत्तम खेळाडू : अंडर-१९ टी-२० विश्वचषक (२०२०)

विजय हजारे स्पर्धेत द्विशतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू.

आयपीएलमध्ये सर्वोच्च खेळी साकारणारा अनकॅप्ड खेळाडू.

logo
marathi.freepressjournal.in