

मुंबई : २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (कॉमनवेल्थ गेम्स) यजमानपदाचे हक्क अखेर भारताला मिळाले आहेत. राष्ट्रकुल क्रीडा कार्यकाळी मंडळातर्फे बुधवारी अहमदाबादच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. २०३६चे ऑलिम्पिक आयोजन करण्याच्या दृष्टीने हे पाऊल फार मोलाचे ठरणार आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. यांना बुधवारी राष्ट्रकुल क्रीडा संघटनेचे अध्यक्ष डॉ. डोनाल्ड रुकारे यांनी आयोजनपत्र सुपुर्द केले. ग्लासगो येथे ही बैठक पार पडली. ऑक्टोबरमध्येच भारताकडून अहमदाबादचे नाव या स्पर्धेसाठी पुढे करण्यात आले होते. त्यामुळे यावर फक्त शिक्कामोर्तब करण्याची औपचारिकता बाकी होती.
केंद्र सरकार तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालय २०३६मध्ये भारतात ऑलिम्पिकचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) ऑगस्ट महिन्यात राष्ट्रकुलमध्ये समावेश असलेल्या सर्व खेळांची तयारी करण्यास भारत समर्थ असल्याचे आश्वासनही दिले होते. २०३०च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद भूषवून भारताची तयारी दर्शवण्यासाठी केंद्र सरकार व आयओए प्रयत्नशील आहे. यासंबंधीच आयओएच्या पदाधिकाऱ्यांची ऑगस्टमध्ये विशेष सर्वसाधारण सभा पार पडली होती.
अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह हे प्रमुख ठिकाण ठरणार असून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम व्यतिरिक्त या प्रकल्पात जलक्रीडा केंद्र, फुटबॉल स्टेडियम आणि दोन इनडोअर एरिना यांचा समावेश आहे. त्यामुळे ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल पदाधिकाऱ्यांऱ्या बैठकीत या सर्व बाबींचा आढाव घेण्यात आला व भारताच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.
२०२६ची राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगो (स्कॉटलंड) येथे होणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत भारताला २०३०च्या राष्ट्रकुलसाठी अधिकृत अर्ज भरावा लागणार होता. भारताने सर्व प्रणाली योग्यपणे पार पाडली. कॅनडाने या स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. तर नायजेरियाला डावलण्यात आले आहे. त्यामुळे २०१० नंतर पुन्हा एकदा भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. त्यावेळी ७० हजार कोटी इतका खर्च झाला होता. २०३०मध्ये १,६०० कोटी खर्च अपेक्षित आहे.