भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून स्टिमॅच यांची तडकाफडकी हकालपट्टी

सुनील छेत्री निवृत्त झाल्यानंतर कतारविरुद्ध नुकताच झालेल्या पात्रता फेरीतील दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ गटात तिसऱ्या स्थानी राहिल्याने त्यांना आगेकूच करता आली नाही.
भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून स्टिमॅच यांची तडकाफडकी हकालपट्टी
Published on

नवी दिल्ली : इगॉर स्टिमॅच यांची सोमवारी भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) हा निर्णय घेतला असून भारतीय संघाला फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीचा तिसरा टप्पा गाठण्यात अपयश आल्याने स्टिमॅच यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे समजते.

क्रोएशियाच्या ५६ वर्षीय स्टिमॅच यांनी २०१९मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. २०२३मध्ये त्यांचा करार एका वर्षाने वाढवण्यात आला. सुनील छेत्री निवृत्त झाल्यानंतर कतारविरुद्ध नुकताच झालेल्या पात्रता फेरीतील दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ गटात तिसऱ्या स्थानी राहिल्याने त्यांना आगेकूच करता आली नाही.

“भारतीय संघाला विश्वचषक पात्रतेचा तिसरा टप्पा गाठण्यात अपयश आल्याने सर्वच जण निराश आहोत. त्यामुळे महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने नव्या प्रशिक्षकाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्टिमॅच यांना प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याबाबत कळवण्यात आले आहे,” असे महासंघाने निवेदनात स्पष्ट केले.

स्टिमॅच यांचा कार्यकाळ

स्टिमॅच हे १९९८मध्ये क्रोएशियाच्या संघाचा खेळाडू म्हणून भाग होते. त्यावेळी क्रोएशियाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. स्टेफन कॉन्सन्टाइन यांनी राजीनामा दिल्यानंतर २०१९मध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने दोन सॅफ अजिंक्यपद, एक तिरंगी मालिका तसेच एक आंतरखंडिय चषक पटकावला. मात्र विश्वचषक पात्रतेचे लक्ष्य त्यांना गाठता आले नाही.

logo
marathi.freepressjournal.in