ऐश्वर्यचा विक्रमासह रौप्यवेध; जागतिक नेमबाजी स्पर्धेत इशा-सम्राट जोडीचीसुद्धा रौप्यपदकावर मोहोर

प्रतिभावान नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरने मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी केली. इजिप्त येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर्यने पात्रता फेरीत विश्वविक्रम प्रस्थापित केला.
ऐश्वर्यचा विक्रमासह रौप्यवेध; जागतिक नेमबाजी स्पर्धेत इशा-सम्राट जोडीचीसुद्धा रौप्यपदकावर मोहोर
Published on

कैरो : प्रतिभावान नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरने मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी केली. इजिप्त येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर्यने पात्रता फेरीत विश्वविक्रम प्रस्थापित केला. मग अंतिम फेरीत रौप्यपदकही पटकावले. त्याशिवाय सम्राट राणा आणि ईशा सिंग यांच्या जोडीनेही रौप्यपदकाचा वेध साधला.

इजिप्त येथे जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा सुरू असून यामध्ये भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारत सध्या पदकतालिकेत दुसऱ्या स्थानी असून त्यांच्या खात्यात ३ सुवर्ण, ५ रौप्य व ३ कांस्य अशी एकूण ११ पदके जमा आहेत. चीन ८ सुवर्णांसह एकूण १४ पदके जिंकल्याने अग्रस्थानी विराजमान आहे.

दरम्यान, मंगळवारी पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात २४ वर्षीय ऐश्वर्यने पात्रता फेरीत ५९७ गुण कमावून विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्याने अग्रस्थानासह अंतिम फेरी गाठली होती. मात्र तेथे तो काहीसा कमी पडला. आठ जणांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत ऐश्वर्यने ४६६.९ गुण मिळवून रौप्यपदक प्राप्त केले. चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या ल्यू युकूनने ४६७.१ गुणांसह सुवर्ण पटकावले. म्हणजेच ऐश्वर्य फक्त ०.२ गुणांनी ल्यूच्या मागे राहिला.

“माझ्या कारकीर्दीतील हे एकेरीतील पहिलेच जागतिक पदक आहे. त्यामुळे हे यश नेहमीच स्मरणात राहील. सुवर्णपदक हुकल्याची खंत आहे. मात्र पुढील वेळेस आणखी मेहनत करेन. पात्रता फेरीतील विक्रमाची मला कल्पना नव्हती. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळवता आले,” असे ऐश्वर्य म्हणाला. अंतिम आठ जणांतील भारताचा अन्य स्पर्धक नीरज कुमारला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.

त्यानंतर १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात इशा व सम्राट यांच्या भारतीय जोडीने कमाल केली. त्यांनी पात्रता फेरीत ५८६ गुण वसूल करून अंतिम फेरी गाठली. मग अंतिम फेरीत अपेक्षेप्रमाणे त्यांच्यापुढे चीनच्याच जोडीचे आव्हान होते. याओ व काय हू या चीनच्या जोडीने इशा-सम्राट यांच्यावर १६-१० अशी मात केली. त्यामुळे भारतीय जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुढील काही दिवसांत भारतीय नेमबाजांकडून या स्पर्धेत आणखी पदकांची अपेक्षा बाळगण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in