

मुंबई : नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेला भारताचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणे आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतून कसोटी समालोचक म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
१५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी रहाणे आता ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’च्या समालोचकांच्या पॅनेलमध्ये सामील होणार आहे. प्रथम श्रेणी पदार्पणानंतर तब्बल १८ वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम देणारा रहाणे आता मायक्रोफोनमागे नवी भूमिका बजावणार आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय लाल चेंडूच्या क्रिकेटचा अनुभव तो या प्रसारणाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवणार आहे.
३७ वर्षीय रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी सामने खेळले असून, ३८.४६ च्या सरासरीने ५,०७७ धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तसेच मध्य फळीतील फलंदाज म्हणून परदेशातील अनेक संस्मरणीय विजयांमध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’ आणि ‘सोनी लिव्ह’वर भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी कसोटी समालोचनात पदार्पण करताना मला आनंद होत असल्याचे रहाणेने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. कसोटी क्रिकेट हे खेळातील सर्वोच्च शिखर असून, इतकी वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता वेगळ्या दृष्टिकोनातून खेळाकडे पाहणे हा एक बहुमान असल्याचे तो म्हणाला. खेळाचे बारकावे आणि रणनीती चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत, या अनुभवातून चाहत्यांना मैदानातील घडामोडींची सखोल माहिती मिळेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.