
मुंबई : मुंबईकर अजित आगरकर हा सध्या भारताच्या राष्ट्रीय निवड समितीचा अध्यक्ष असून त्याचा कार्यकाळ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे. नुकताच आशिया चषकासाठी केलेल्या संघनिवडीमुळे आगरकर चर्चेत आले आहेत.
४७ वर्षीय आगरकर जुलै २०२३पासून निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने २०२३चा एकदिवसीय विश्वचषक, २०२०४चा टी-२० विश्वचषक व २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघनिवड केली.
दरम्यान, ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाचे संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मंगळवारी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी संघाची घोषणा केली. या संघात शुभमन गिलचे पुनरागमन झाले असून त्याला थेट उपकर्णधारपद देण्यात आले आहे. मात्र त्याच वेळी ३० वर्षीय श्रेयसला संघात स्थान न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. श्रेयस राखीव खेळाडूंतही नाही.
२०२५च्या आयपीएलमध्ये श्रेयसने पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. श्रेयसने १७ सामन्यांत १७५च्या स्ट्राइक रेटने ६०४ धावा केल्या. त्यापूर्वी मार्च महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रेयसने भारताकडून सर्वाधिक २४३ धावा केल्या होत्या. इतकेच नव्हे तर, श्रेयसच्या नेतृत्वात मुंबईने गतवर्षी मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद मिळवले. श्रेयस हा फक्त एकदिवसीय संघाचा भाग आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी डावलल्यावर किमान टी-२० संघात त्याचे पुनरागमन होईल, असे अपेक्षित होते.
श्रेयसला संघात स्थान का नाही लाभले, याविषयी विचारले असता आगरकर यांनी टी-२० संघात भारतीय फलंदाजांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेकडे लक्ष वेधले. “श्रेयसकडे अफाट गुणवत्ता आहे, यात शंका नाही. मात्र सध्या टी-२० संघातील प्रत्येक स्थानासाठी जोरदार चुरस आहे. गेल्या वर्षभरातील कामगिरीच्या आढावा घेतल्यास तुम्ही संघातील कोणत्या खेळाडूला बाहेर करून श्रेयसला संधी देणार. श्रेयसला त्याच्या संधीची प्रतीक्षा करावी लागेल,” असे आगरकर म्हणाले होते.