आगरकर यांच्या करारात पुन्हा वाढ? निवड समितीच्या अध्यक्षपदी किमान वर्षभर कायम ठेवण्यासाठी BCCIला विनंती

भारताच्या राष्ट्रीय पुरुष निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या करारात एका वर्षाने पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
आगरकर यांच्या करारात पुन्हा वाढ? निवड समितीच्या अध्यक्षपदी किमान वर्षभर कायम ठेवण्यासाठी BCCIला विनंती
Published on

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रीय पुरुष निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या करारात एका वर्षाने पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या आगरकर यांनी स्वत: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) यासंबंधी विनंती केली असून अन्य पर्याय न सापडल्यास आगरकर २०२७च्या जून महिन्यापर्यंत या पदावर कायम राहण्याची शक्यता आहे. बीसीसीआय संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून मात्र याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.

४८ वर्षीय आगरकर २०२३च्या आशिया चषकापूर्वी निवड समितीच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी फेब्रुवारी २०२३मध्ये राजीनामा दिल्यावर आगरकर यांची ४ जुलै, २०२३ रोजी या पदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून नुकताच मार्च महिन्यात संपलेल्या टी-२० विश्वचषकापर्यंत आगरकर यांच्याकडे निवड समितीचे अध्यक्षपद भूषवत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत शिवसुंदर दास, प्रग्यान ओझा, रुद्रप्रताप सिंग व अजय रत्रा हे अन्य चार विभागातील सदस्य होते. आगरकर हे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करतात.

मात्र आगरकर यांचा करार यंदा जून महिन्याच्या ३१ तारखेला समाप्त होईल. मे महिन्यापर्यंत आयपीएल रंगणार असून जून महिन्यात भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यामुळे आगरकर या मालिकेनंतर पदावर नसतील, असे समजते. कारण नियमानुसार निवड समितीचे अध्यक्षपद दोन वर्षेच भूषवता येऊ शकते. तसेच त्यामध्ये एका वर्षाची वाढ होऊ शकते. आगरकर यांचा कार्यकाळ २०२५च्या आयपीएलनंतर जून महिन्यात संपुष्टात आला होता. मात्र आधीच त्यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. आता आगरकर यांनी पुन्हा करार वाढवण्याची विनंती केली आहे. पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका येथे एकदिवसीय विश्वचषक रंगणार आहे. कदाचित तोपर्यंत आगरकरच निवड समितीचे अध्यक्षपद राहणार, असे दिसते. प्रशिक्षक गौतम गंभीरचा करारही २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आहे.

आगरकर यांच्या कार्यकाळात भारताने २०२४मध्ये टी-२० विश्वचषक, २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, तर २०२६मध्ये पुन्हा टी-२० विश्वचषक असे तीन आयसीसी स्पर्धांचे जेतेपद मिळवले. मात्र कसोटी प्रकारात भारताची कामगिरी ढासळली. भारताने मायदेशात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांच्याकडून कसोटी मालिकेत पराभव पत्करला. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धही मालिका गमावली. इंग्लंडला संघर्षानंतर किमान बरोबरीत रोखले. विशेषत: रोहित शर्मा व विराट कोहली यांना कसोटीतून निवृत्त होण्यास आगरकर यांच्या समितीने भाग पाडल्याचे समजते. तसेच गतवर्षी रोहित-विराट हे २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी फारसे उत्सुक दिसत नाहीत, असे मतही आगरकर यांनी व्यक्त केले होते. त्यामुळेच शुभमन गिलकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवण्याचा धक्कादायक निर्णय आगरकर यांनी घेतला. याप्रकरणी अनेकांनी टीकाही करताना आगरकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

गंभीरने मात्र विश्वचषकानंतर आगरकरचे कौतुक केले होते. “आगरकर यांनी निवडलेला संघ स्पर्धेसाठी उत्तम होता. त्यामुळे त्यांच्या समितीलाही विश्वचषकाचे श्रेय देणे गरजेचे आहे. आम्हा दोघांचेही अनेकदा विविध मुद्द्यांवर समान मत असल्याने कार्य करताना अडथळे जाणवले नाही,” असे गंभीर म्हणाला होता. आता आगरकर यांच्या करारबाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे लक्ष असेल.

आगरकर यांच्या कार्यकाळातील कामगिरी

  • आगरकर यांच्या कार्यकाळात भारताने २०२४मध्ये टी-२० विश्वचषक, २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, तर २०२६मध्ये पुन्हा टी-२० विश्वचषक असे तीन आयसीसी स्पर्धांचे जेतेपद मिळवले.

  • मात्र कसोटी प्रकारात भारताची कामगिरी ढासळली. भारताने मायदेशात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांच्याकडून कसोटी मालिकेत पराभव पत्करला. ऑस्ट्रेलियाविरुद्धही मालिका गमावली. रोहित शर्मा व विराट कोहली यांना कसोटीतून निवृत्त होण्यास आगरकर यांच्या समितीने भाग पाडल्याचे समजते.

  • नियमानुसार निवड समितीचे अध्यक्षपद दोन वर्षेच भूषवता येऊ शकते. तसेच त्यामध्ये एका वर्षाची वाढ होऊ शकते. आगरकर यांचा कार्यकाळ २०२५च्या आयपीएलनंतर जून महिन्यात संपुष्टात आला होता. मात्र आधीच त्यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in