
बर्मिंगहॅम : भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आकाश दीपने हा विजय त्याच्या बहिणीला समर्पित केला. आकाशची बहीण ज्योती गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. २०१५मध्ये आकाशचे वडील रामजी आणि भाऊ यांचे सहा महिन्यांच्या कालावधीत निधन झाले होते. त्यानंतर आई आणि बहिणीनेच आकाशला क्रिकेटपटू बनण्यासाठी प्रेरित केले व त्याचा सांभाळ केला.
“मी कुणालाही याविषयी फारसे सांगितले नाही. मात्र हा विजय मी माझ्या बहिणीला समर्पित करू इच्छितो. ती सध्या इस्पितळात असून कर्करोगाशी झुंज देत आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी मीसुद्धा तिच्यासोबत राहून तिची काळजी घेत होतो. मात्र संघात निवड झाल्यावर मी येथे आलो. माझ्या बहिणीने मला कारकीर्दीत इथवर मजल मारण्यासाठी फार मदत केली आहे,” असे आकाश म्हणाला.
आकाशच्या बहिणीनेसुद्धा यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आकाश टीव्हीवर इतक्या उघडपणे जाहीर करेल, असे आपल्याला वाटले नव्हेत, असे ज्योती म्हणाली. मात्र तिने आकाशला खेळावरच लक्ष केंद्रित करण्याचे सुचवले. तसेच लवकरच आपण या आजारातून सावरून तुझा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येऊ, असा संदेश ज्योतीने आकाशला दिला.
आकाश हा इंग्लंडमध्ये कसोटीत १० बळी घेणारा दुसराच गोलंदाज ठरला. चेतन शर्मा यांनी १९८६मध्ये अशी कामगिरी केली होती. पहिल्या कसोटीतच प्रसिध कृष्णाच्या जागी आकाशला संधी मिळायला हवी होती, असे अनेकांचे म्हणणे होते. आता तिसऱ्या कसोटीत बुमरा परतल्यावर आकाश, सिराज व बुमरा यांचे त्रिकुट लॉर्ड्सवर इंग्लंडच्या फलंदाजांना नक्कीच हैराण करेल, अशी भारतीय चाहत्यांना आशा आहे.