
बर्मिंगहॅम : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या पदरी पुन्हा निराशा पडली. शुक्रवारी लक्ष्य सेनच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतील अभियान समाप्त झाले.
बॅडमिंटन विश्वात प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या या स्पर्धेत भारताच्या एकाही खेळाडूला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नाही. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत चीनच्या सहाव्या मानांकित ली शी फेंगने लक्ष्यला २१-१०, २१-१६ असे सहज पराभूत केले. २०२२मध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या लक्ष्यला पॅरिस ऑलिम्पिकमध्येसुद्धा फेंगकडूनच कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता.
दुसरीकडे महिला दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या ल्यू शेंग आणि टॅन निंग या दुसऱ्या मानांकित जोडीने भारतीय जोडीवर २१-१४, २१-१० असे सहज वर्चस्व गाजवले. लक्ष्य आणि ट्रीसा-गायत्री यांनी गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा होती. मात्र त्यांनाही शुक्रवारी अपयश आले.
त्यापूर्वी, पुरुष दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी दुखापतीमुळे माघार घेतली. महिला एकेरीत अनुभवी पी. व्ही. सिंधूला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. तसेच मालविका बनसोड, रोहन कपूर-ऋत्विका यांना पराभव पत्करावा लागला होता. १,००० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत गेल्या अनेक वर्षांपासून एकाही भारतीयाला जेतेपद मिळवता आलेले नाही. २००१मध्ये पुलेला गोपीचंद यांनी ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर सायना नेहवाल (२०१५), लक्ष्य (२०२२) जेतेपदाच्या जवळ पोहोचले. मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
बॅडमिंटनपटूंची कामगिरी निराशाजनक
पॅरिस ऑलिम्पिकमधील अपयशानंतरही भारतीय बॅडमिंटनपटूंची निराशाजनक कामगिरी सुरू आहे. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया माजी बॅडमिंटनपटू विमल कुमार यांनी व्यक्त केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकपासून भारताला एकेरीत एखादी स्पर्धा जिंकण्यात तसेच अंतिम फेरी गाठण्यातही अपयश येत आहे.