
बर्मिंगहम : रोहन कपूर आणि ऋत्विका शिवानी गड्डा या भारतीय जोडीने ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या मिश्र दुहेरीत ये हाँग वुई आणि निकोले गाँझाल्स चन या चायनिज-तैपाई जोडीवर संघर्षपूर्ण विजय मिळवत बुधवारी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
अरेना बर्मिंगहम येथे खेळल्या गेलेल्या लढतीत जागतिक क्रमवारीत ४०व्या स्थानी असलेल्या रोहन आणि ऋत्विका या भारतीय जोडीने २१-१०, १७-२१ आणि २४-२२ असा थरारक विजय मिळवला. भारतीय जोडीचा पुढचा सामना पाचव्या क्रमांकावर असलेल्या यान झी फेंग आणि या क्झिन वुई या चायनिज जोडीशी होणार आहे.
लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांनी पुरुष आणि महिला एकेरीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी डेन्मार्कच्या डॅनियल लुंडगार्ड आणि मॅड्स वेस्टरगार्ड यांना भिडणार आहे.
सिंधू पराभूत
भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूला स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातच बुधवारी पराभव पत्करावा लागला. ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या महिला एकेरीच्या या लढतीत कोरियाच्या कीम गा इयूनने सिंधूला तीन गेमच्या लढतीत धूळ चारली. सिंधूने हा सामना १-२ ने गमावला. दुखापतीनंतर सिंधूने या स्पर्धेत पुनरागमन केले आहे. मात्र स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत भारतीय खेळाडूला पराभवाचा सामना करावा. बुधवारी झालेल्या या लढतीत पहिला गेम जिंकूनही सिंधूला सामना आपल्या बाजूने वळवता आला नाही. सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूला २१-१९ अशी मात दिली. दुसऱ्या सेटमध्ये कोरियन खेळाडूने १३-२१ असा सामना जिंकत स्पर्धेत पुनरागमन केले. त्यानंतर अखेरच्या गेममध्ये कोरियन खेळाडूने भारतीय खेळाडूला टिकू दिले नाही. तिने ही लढत १३-२१ अशी खिशात घातली. तीन सेटच्या या लढतीत भारताच्या पीव्ही सिंधूला गाशा गुंडाळावा लागला.