ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा; लक्ष्यची उपांत्य फेरीत धडक

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा; लक्ष्यची उपांत्य फेरीत धडक

२०२२मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानलेल्या लक्ष्यने यंदा विजेतेपदाच्या दिशेने कूच केली आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या लक्ष्य सेन याने आपली ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली आहे. लक्ष्यने शनिवारी उपांत्य फेरीत मलेशियाच्या ली झि जिया याचा तीन गेममध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.

२०२२मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानलेल्या लक्ष्यने यंदा विजेतेपदाच्या दिशेने कूच केली आहे. त्याने शनिवारी १ तास १० मिनिटे रंगलेल्या उत्कंठावर्धक लढतीत २०२१च्या विजेत्या ली झी जिया याचा २०-२२, २१-१६, २१-१९ असा पराभव केला. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेल्या गेल्या पाच लढतींमधील लक्ष्यचा हा चौथा विजय ठरला आहे.

लक्ष्यने पहिल्याच गेममध्ये दमदार सुरुवात करत ५-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र जागतिक क्रमवारीत लक्ष्यपेक्षा आठ स्थानांनी पुढे म्हणजेच १०व्या क्रमांकावर असेलल्या जियाने त्याला चोख प्रत्युत्तर देत गुण वसूल केले. त्यामुळेच एका क्षणी जियाने १७-१६ अशी किंचितशी आघाडी घेतली होती. लक्ष्यने तीन गेमपॉइंट वाचवल्यामुळे २०-२० अशी बरोबरी झाली होती. अखेर ली झी जिया याने सलग दोन गुण मिळवत पहिला गेम आपल्या नावावर केला.

दुसऱ्या गेममध्ये काहीशी धीमी सुरुवात केल्यानंतर लक्ष्यने सलग पाच गुण मिळवत ६-३ अशी आगेकूच केली. त्यानंतर जियाने दमदार स्मॅशेस लगावत गुण वसूल करून १६-१४ अशी मुसंडी मारली. त्यानंतर मात्र लक्ष्यने मागे वळून पाहिले नाही. त्याने जियाला चोख प्रत्युत्तर देत सलग सात गुण मिळवून दुसरा गेम आपल्या नावावर केला. १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर निर्णायक गेममध्ये लक्ष्यने आपल्या आक्रमणाची धार आणखीनच वाढवली. लक्ष्यचे स्मॅशेस वाचवण्याच्या नादात जियाकडून चुका होत गेल्या. त्यामुळे लक्ष्य तिसऱ्या गेममध्ये ११-८ अशा आघाडीवर होता. मध्यंतरानंतर जियाने लक्ष्यला मोठ्या रॅलीजमध्ये गुंतवून ठेवले. मात्र त्याला लक्ष्यला मागे टाकून आघाडी घेता आली नाही. लक्ष्यने आपली आघाडी कायमपणे टिकवत तिसरा गेम २१-१९ अशा फरकाने जिंकून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना इंडोनेशियाचा जोनाथन ख्रिस्ती याच्याशी होणार आहे.

लक्ष्यने यंदाच्या मोसमात सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी त्याने फ्रेंच ओपन सुपर ७५० स्पर्धेत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता.

logo
marathi.freepressjournal.in