बुमराच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष;भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य

भारताला पहिल्या लढतीत आरोन फिंचच्या आस्ट्रेलियाने चार गडी आणि चार चेंडू राखून नमवले.
 बुमराच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष;भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य

प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय संघाला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात महागात पडला. त्यामुळे शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणाऱ्या दुसऱ्या लढतीत बुमराच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताला पहिल्या लढतीत आरोन फिंचच्या आस्ट्रेलियाने चार गडी आणि चार चेंडू राखून नमवले. भारताने दिलेले २०९ धावांचे लक्ष्यही ऑस्ट्रेलियाने पार केले. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघनिवड झाली असली तरी भारताची तयारी अद्याप १०० टक्के झालेली नाही, हे यावरून स्पष्ट होते. दुखापतीमुळे आशिया चषकाला मुकणाऱ्या बुमराला पहिल्या लढतीत विश्रांती देण्यात आली होती. मात्र आता त्याला खेळवावेच लागेल, हे स्पष्ट असून बुमराला कोणतीही दुखापत वगैरे झाले नसल्याचे सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. क्षेत्ररक्षण सुधारण्याकडेही भारताला लक्ष द्यावे लागणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी नागपूरमधील जामठा स्टेडियमवर उभय संघ आमनेसामने येणार असून या लढतीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. हवामान खात्याने शुक्रवारी सकाळी पावसाची शक्यता वर्तवली असून दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असल्याचे समजते. गुरुवारी भारतीय संघाचे सराव सत्रही पावसामुळे रद्द करण्यात आले. ४५ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया लढतीचा आनंद लुटण्यासाठी चाहते उत्सुक असून सर्व तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे पावसाने खोळंबा न केल्यास रसिकांना दर्जेदार लढत पाहायला मिळेल.

हार्दिक, सूर्यकुमार लयीत

फलंदाजीचा विचार करता हार्दिक पंड्या, सूर्यकुमार आणि के. एल. राहुल या त्रिकुटाने लय मिळवली आहे. हार्दिक आणि राहुल यांनी पहिल्या सामन्यात अर्धशतके झळकावली. तर सूर्यकुमारनेही नेत्रदीपक फटकेबाजी केली. मात्र रोहित आणि विराट कोहलीकडूनही चाहत्यांना चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. त्यातच ऋषभ पंतला या लढतीत संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. दिनेश कार्तिकला पहिल्या सामन्यात फक्त सहाच धावा करता आल्या.

हर्षल किंवा भुवनेश्वरला डच्चू

बुमरा या लढतीत खेळणार हे स्पष्ट असल्याने त्याच्या समावेशासाठी हर्षल पटेल किंवा भुवनेश्वर कुमार यांच्यापैकी एकाला वगळणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. तसेच उमेश यादवलासुद्धा संघाबाहेर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. फिरकीपटू अक्षर पटेलने गेल्या लढतीत छाप पाडली. मात्र युझवेंद्र चहलकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. डेथ ओव्हर्समधील भारताची गोलंदाजी चिंतेचा विषय असून रोहित कशाप्रकारे गोलंदाजांना हाताळतो, यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून आहे.

ग्रीन, वेडपासून धोका

ऑस्ट्रेलियाच्या संघाची भिस्त प्रामुख्याने कर्णधार आरोन फिंच आणि प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ यांच्यावर असेल. मात्र कॅमेरून ग्रीन आणि मॅथ्यू वेड यांनीही मोक्याच्या क्षणी फटकेबाजी केल्यामुळे भारताला सावध राहावे लागेल. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात पॅट कमिन्स, जोश हेझलवूड यांसारखे वेगवान, तर अॅडम झम्पासारखा किफायतशीर फिरकीपटू आहे. त्याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये छाप पाडणाऱ्याटिम डेविडकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमरा, उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, टिम डेविड, नॅथन एलिस, सीन अॅबट, अॅश्टन अॅगर, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, अॅडम झम्पा.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत २४ ट्वेन्टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी १३, तर ऑस्ट्रेलियाने १० लढती जिंकल्या आहेत. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

यंदाच्या वर्षात भारताने आतापर्यंत खेळलेल्या २७ ट्वेन्टी-२० सामन्यांपैकी फक्त तीन लढतींमध्येच जसप्रीत बुमरा खेळला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in