नीरज-नदीमच्या द्वंद्वाकडे आज लक्ष! दोघांचीही जागतिक स्पर्धेत भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक; सचिनचीसुद्धा आगेकूच
Photo : X

नीरज-नदीमच्या द्वंद्वाकडे आज लक्ष! दोघांचीही जागतिक स्पर्धेत भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक; सचिनचीसुद्धा आगेकूच

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली. प्राथमिक फेरीत पहिल्याच प्रयत्नात त्याने ८४.८५ मीटर अंतर गाठत थेट अंतिम फेरीत मजल मारली. सचिन यादवनेही पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. मात्र गुरुवारी होणाऱ्या अंतिम फेरीत नीरजसमोर पाकिस्तानचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम हे खरे आव्हान असेल.
Published on

टोकियो : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने बुधवारी पुन्हा एकदा संपूर्ण विश्वाला आपल्या प्रतिभेची जाणीव करून दिली. जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील भालाफेकीच्या प्राथमिक फेरीत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८४.८५ मीटर अंतर सर करून ऐटीत अंतिम फेरी गाठली. त्याशिवाय भारताच्या सचिन यादवनेही आगेकूच केली. मात्र नीरजसमोर गुरुवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत खरे आव्हान असेल ते पाकिस्तानचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमचे.

एकीकडे २७ वर्षीय नीरजने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरी गाठली, तर २८ वर्षीय नदीमने तिसऱ्या प्रयत्नात ८५.२८ मीटर भालाफेक करून आगेकूच केली. त्यामुळे आता पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर पुन्हा एकदा भालाफेकीच्या मैदानात चाहत्यांना भारत-पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळणार आहे. गतवर्षी ऑलिम्पिकमध्ये नदीमने सुवर्ण पटकावले होते, तर भारताच्या नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यातच सध्या भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर असल्याने नीरज-नदीमच्या द्वंद्वाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

१३ ते २१ सप्टेंबर या कालावधीत टोकियो येथे रंगणाऱ्या जागतिक स्पर्धेत भारताचे १९ खेळाडू सहभागी होणार आहेत. दर दोन वर्षांनी जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा जागतिक स्पर्धेचे २०वे पर्व आहे. २०२३मध्ये हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताने एकमेव सुवर्णदपदकासह १८वा क्रमांक मिळवला होता. नीरजनेच भारतासाठी ते सुवर्ण जिंकले होते.

दरम्यान, बुधवारी झालेल्या पुरुषांच्या प्राथमिक फेरीत ८४.५० मीटर अंतर गाठणारे किंवा सर्वोत्तम १२ भालाफेकपटू थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार होते. पात्रता फेरीत एकूण ३७ जणांचा समावेश होता. त्यांपैकी अ-गटात १९, तर ब-गटात १८ भालाफेकपटू सहभागी झाले होते. नीरज व सचिन अ-गटात, तर नदीम व भारताचे अन्य दोन स्पर्धक यशवीर सिंग व रोहित यादव ब-गटात होते. नीरजने अ-गटातून तिसरे स्थान मिळवताना ८४.८५ मीटर भालाफेक केली. त्यामुळे त्याला उर्वरित दोन प्रयत्नांची गरज भासली नाही. अ-गटात जर्मनीच्या डायमंड लीग विजेत्या जुलियन वेबरने ८७.२१ मीटरच्या भालाफेकीसह अग्रस्थान मिळवले. याच गटात भारताचा सचिन ८३.६७ मीटरच्या भालाफेकीसह सहाव्या स्थानी राहिला.

ब-गटात ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्सने ८९.५३ मीटर अंतरासह अग्रस्थान काबिज केले. नदीमने पहिल्या दोन प्रयत्नांत फक्त ७६.९९ व ७४.१७ मीटर भालाफेक केली होती. मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८५.२८ मीटर भालाफेक करून गटातून तृतीय क्रमांकासह आगेकूच केली. या गटात रोहित ७७.८१ मीटरसह १४व्या, तर यश ७७.५१ मीटरसह १५व्या स्थानी राहिला. त्यामुळे रोहित व यश यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. नीरजला मात्र नदीमसह वेबर आणि पीटर्स यांच्याकडूनही जेतेपदासाठी कडवे आव्हान मिळेल, यात शंका नाही.

“पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम आणि माझी फक्त खेळापुरताच मैत्री आहे. आमच्यात काही जवळचे नाते नाही. तसेच आता भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावानंतर आमची मैत्री आणखी घट्ट होईल, असेही वाटत नाही. मात्र नदीम माझा आदर करतो. माझ्याशी चांगला वागतो, म्हणूनच मीसुद्धा त्याला माणुसकीच्या नात्याने आदर देतो,” असे स्पष्ट मत नीरजने काही महिन्यांपूर्वी मांडले होते.

२७ वर्षीय नीरजने यापूर्वी २०२२च्या जागतिक स्पर्धेत रौप्य, तर २०२३च्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. यंदाच्या वर्षात नीरजला बहुतांश स्पर्धांमध्ये दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानी राहणाऱ्या नीरजने वर्षभरात फक्त गोल्डन स्पाईक व नीरज चोप्रा क्लासिक या स्पर्धा जिंकल्या. दोहा येथील डायमंड लीगच्या टप्प्यात नीरजने ९० मीटरचे अंतर गाठले होते. त्यामुळे आता जागतिक स्पर्धेतील पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरज पुन्हा ९० मीटर गाठून जेतेपद पटकावणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत नीरजव्यतिरिक्त अन्य भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत निराशा केली आहे. त्यामुळे नीरज पुन्हा एकदा जागतिक पदकाची एकमेव आशा असून सचिनही गुरुवारी काही कमाल करणार का, याकडे अवघ्या भारतीयांचे लक्ष लागून आहे.

नीरज-नदीम हस्तांदोलन करणार?

  • पाकिस्तानच्या नदीमने २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले, तर नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी नदीमने ९२ मीटरहून पुढे भालाफेक करत सुवर्ण पटकावले, तर नीरजला ८९.४५ मीटर अंतरावर भालाफेक करूनही रौप्यपदक मिळाले. तसेच जुलै महिन्यात भारतात झालेल्या नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत प्रथम नदीम सहभागी होणार होता.

  • नीरज व नदीमची चांगली मैत्री असल्याने त्याने नदीमला एप्रिलमध्येच निमंत्रण दिले होते. मात्र मे महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या २६ जणांचा बळी गेला. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी बिघडले. नीरजवरही काही जणांनी टीका केली. परिणामी नदीम त्या स्पर्धेतून बाहेर गेला.

  • आता ऑगस्ट २०२४ नंतर प्रथमच नीरज-नदीम एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. एकीकडे क्रिकेटमध्ये आशिया चषकातील भारत-पाकिस्तान यांच्यातील हस्तांदोलनाचा विषय चर्चेत असताना गुरुवारी नीरज नदीमशी हस्तांदोलन करणार का किंवा दोघांनीही अव्व्ल तिघांत स्थान मिळवले, तर छायाचित्रासाठी पोडीयमवर एकत्रित पोझ देणार का, याकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून आहे.

तिहेरी उडीत प्रवीण, अबूबाकर अपयशी

पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात भारताच्या प्रवीण चित्रावेल आणि अब्दुल्ला अबूबाकर यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. प्रवीणने पात्रता फेरीत १५वे स्थान मिळवताना १६.७४ मीटर अंतरावर झेप घेतली. तर अबूबाकरने १६,३३ मीटर अंतर गाठले. सर्वोत्तम १२ स्पर्धेक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. तसेच १७.१० मीटर अंतर गाठणारे खेळाडू थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार होते. मात्र भारताच्या दोघांनाही यामध्ये अपयश आले.

धावण्याच्या शर्यतीत तेजसला हुलकावणी

पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत तेजस शिर्से, तर २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अनिमेश कुजूर यांनी निराशा केली. दोघांनाही उपांत्य फेरी गाठता आली नाही. तेजसने पात्रता फेरीत १३.५७ सेंकद वेळ नोंदवली. उपांत्य फेरीसाठी १३.५१ सेकंदांत ही शर्यत पूर्ण करणे गरजेचे होते. त्यामुळे फक्त ०.६ सेकंदांच्या फरकाने तेजस पिछाडीवर पडला. त्याशिवाय २०० मीटर शर्यतीत अनिमेश त्याच्या गटात नवव्या स्थानी राहिला. त्याने २०.७७ सेकंद वेळ नोंदवली. एकंदर ५२ खेळाडूंमध्ये अनिमेशला चक्क ४२व्या स्थानी समाधान मानावे लागले. प्रत्येकी गटातून आघाडीचे तीन जण उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.

logo
marathi.freepressjournal.in