पालेकेले : महीष थिक्षणा (२८ धावांत ३ बळी) आणि वानिंदू हसरंगा (२९ धावांत २ बळी) या फिरकीपटूंनी केलेल्या प्रभावी माऱ्यापुढे भारताची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने २० षटकांत जेमतेम ९ बाद १३७ धावांपर्यंत मजल मारली.
पालेकेले स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारताने यशस्वी जैस्वाल (१०), संजू सॅमसन (०), रिंकू सिंग (१) यांना स्वस्तात गमावले. संजू सलग दुसऱ्या लढतीत शून्यावर बाद झाला. थिक्षणाने यशस्वी, रिंकू यांना जाळ्यात अडकवले. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवही (८) यावेळी अपयशी ठरला. त्यामुळे भारतीय संघ एकवेळ ४ बाद ३० असा संकटात होता.
शुभमन गिलने ३७ चेंडूंत ३९ धावांची झुंज दिली. हसरंगाने त्याचा अडसर दूर केल्यावर रियान पराग (२६) व सुंदर (२५) यांनी प्रतिकार केला. मात्र हे दोघेही अनुक्रमे हसरंगा व थिक्षणाच्या जाळ्यात फसले. त्यामुळे भारताला दीडशे धावांचा पल्ला गाठता आला नाही. भारताने ही मालिका आधीच जिंकली आहे.
रोहित, विराटचा सरावाला प्रारंभ
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल असे प्रमुख खेळाडू कोलंबोत दाखल झाले असून मंगळवारी त्यांनी सरावाला प्रारंभ केला. उभय संघांत अनुक्रमे २, ४ व ७ ऑगस्ट रोजी तीन एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी रोहित संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे, तर जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे.