
वेस्ट इंडिजचा खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू किरण पोलार्डने (Kieron Pollard) आयपीएलमधून (IPL) निवृत्ती घेतली आहे. त्याने स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्याने याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृतीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, २०२३च्या आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्सने तब्बल १२ वर्षांनंतर पोलार्डला रिलीज केले होते. यानंतर त्याने लगेचच निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. पण, तरीही तो मुंबई इंडियन्सची साथ सोडणार नसून तो आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. तो फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
असा होता किरण पोलार्डचा मुंबई इंडियन्ससोबतच प्रवास...
किरण पोलार्ड हा वेस्ट इंडिजचा एक अष्टपैलू खेळाडू होता. २०१० मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये आला. त्यानंतर तो तब्बल १३ हंगामासाठी मुंबईकडून खेळलेला आहे. आयपीएलमध्ये एका संघासाठी १५०हुन अधिक सामने खेळणार तो पहिला खेळाडूदेखील ठरला. त्याने लीगमधील १८९ सामन्यांमध्ये २८.६७ च्या सरासरीने आणि १४७.३२ च्या स्ट्राइक रेटने ३४१२ धावा केल्या आहेत. यामध्ये १६ अर्धशतकांचा समावेश आहे. पोलार्डने फलंदाजीच्या जोरावर मुंबईला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिले. याशिवाय गोलंदाजीमध्येही त्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले. त्याने ६९ विकेट्स घेतल्या असून अनेक निर्णायक सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे त्याने रोहित शर्मा नसताना कर्णधारपदाची भूमिकादेखील केली आहे.