ॲलनचा विक्रमी शतकी तडाखा; पाकिस्तानचा धुव्वा उडवून न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी, न्यूझीलंड-पाकिस्तान टी-२० मालिका

सलामीवीर फिन ॲलनने अवघ्या ६२ चेंडूंत साकारलेल्या १३७ धावांच्या तुफानी विक्रमी शतकाच्या बळावर न्यूझीलंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ४५ धावांनी धुव्वा उडवला.
ॲलनचा विक्रमी शतकी तडाखा; पाकिस्तानचा धुव्वा उडवून न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी, न्यूझीलंड-पाकिस्तान टी-२० मालिका

ऑकलंड : सलामीवीर फिन ॲलनने अवघ्या ६२ चेंडूंत साकारलेल्या १३७ धावांच्या तुफानी विक्रमी शतकाच्या बळावर न्यूझीलंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ४५ धावांनी धुव्वा उडवला. याबरोबरच न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. ॲलनने न्यूझीलंडसाठी टी-२०तील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला. तसेच एका टी-२० डावात सर्वाधिक षटकार लगावण्याच्या बाबतीत त्याने अफगाणिस्तानच्या हझरतुल्ला झझईच्या विक्रमाची बरोबरी केली.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद २२४ धावांचा डोंगर उभारला. अॅलनने ५ चौकार व तब्बल १६ षटकारांसह कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले. अॅलनला टिम सेईफर्ट (३१) व ग्लेन फिलिप्स (१९) यांची साथ लाभली. अन्य कुणीही दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले नाहीत. पाकिस्तानकडून हॅरीस रौफने ६० धावांत २, तर शाहीन आफ्रिदीने ४३ धावांत १ बळी मिळवला.

लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आझमने (३७ चेंडूंत ५८) सलग तिसरे अर्धशतक झळकावूनही पाकिस्तानला २० षटकांत ७ बाद १७९ धावांपर्यंतच मजल मारता आली. टिम साऊदीने दोन, तर मिचेल सँटनर, इश सोधी यांनी प्रत्येकी एक बळी पटकावला. मोहम्मद रिझवान (२४), फखर झमान (१९), इफ्तिकार अहमद (१) अपयशी ठरले.

ॲलनने (१३७) न्यूझीलंडसाठी टी-२०तील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. त्याने ब्रँडन मॅकलमचा विक्रम मोडीत काढला. मॅकलमने २०१२मध्ये बांगलादेशविरुद्ध १२३ धावा केल्या होत्या.

logo
marathi.freepressjournal.in