
सलामीवीर फिन अॅलनने अवघ्या ५६ चेंडूंत साकारलेल्या १०१ धावांच्या तुफानी खेळीमुळे न्यूझीलंडने पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात स्कॉटलंडचा ६८ धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने दोन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करताना अॅलनच्या शतकासह मार्टिन गप्टिल (४०), ग्लेन फिलिप्स (२३), डॅरेल मिचेल (नाबाद २३) आणि जेम्स नीशाम (नाबाद ३०) यांनी दिलेल्या योगदानामुळे न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद २२५ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात स्कॉटलंडला २० षट्कांत ८ बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. कॅलम मॅक्लॉईड (३३) आणि ख्रीस ग्रीव्ह्स (३१) यांनी स्कॉटलंडकडून कडवी झुंज दिली. लेगस्पिनर इश सोधीने २८ धावांत चार, तर डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरने २३ धावांत दोन बळी मिळवून स्कॉटलंडला रोखले.