अहमदनगर : महाराष्ट्रासह, गतविजेते भारतीय रेल्वे, गोवा, हरयाणा यांनी ‘७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धे’त विजयी सलामी दिली. आचारसंहिता असल्याने या स्पर्धेचे उद्घाटन सलग दोन आशियाई कबड्डी स्पर्धा विजेता अर्जुन पुरस्कारप्राप्त अशोक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्यांदाच कबड्डीच्या इतिहासात भाषण करण्याचे टाळण्यात आले. अहमदनगर, वाडिया पार्क येथील मॅटवर झालेल्या ब गटाच्या सामन्यात यजमान महाराष्ट्राने गुजरातला ४८-३१ असे पराभूत केले. पण त्याकरिता त्यांना पूर्वार्धात कडव्या संघर्षाला सामोरे जावे लागले.
सामन्याच्या पहिल्याच चढाईत अस्लमने बोनस गुण घेत संघाचे खाते खोलले. पण गुजरातने पहिला लोण महाराष्ट्रावर देत १३-०९ अशी आघाडी घेतली. पूर्वार्धात अस्लम, आकाश व आदित्य या तिघांच्या पकडी झाल्याने महाराष्ट्रावर लोण देण्यात गुजरात यशस्वी झाले. पण पुन्हा एकदा महाराष्ट्राने कमबॅक करत २१-१९ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात झटपट लोण देण्याच्या प्रयत्नात अस्लमची पुन्हा २ खेळाडूंत पकड झाल्याने २१-२१ अशी बरोबरी झाली. पण यानंतर मात्र महाराष्ट्राने गुजरातवर २ लोण देत आघाडी घेतली. शेवटी १७ गुणांच्या फरकाने महाराष्ट्राने सामना जिंकला.
आकाश शिंदे, आदित्य शिंदे यांच्या चढाया, तर मयूर कडमचा भक्कम बचाव यामुळे हे शक्य झाले. महाराष्ट्राने पूर्ण सामन्यात ९ बोनस गुण मिळविले. गुजरातला अवघा १ बोनस गुण घेता आला. अस्लमवर आज नेतृत्वाचे दडपण आल्यासारखे वाटत होते.
अ गटात भारतीय रेल्वेने बीएसएनएलचा ४०-०७ असा धुव्वा उडविला. अन्य सामन्यात क गटात गोव्याने बंगालचा ४६-१६ असा तर ड गटात हरयाणाने उत्तराखंडला ४२-२२ असे पराभूत केले.