दिवसा नोकरीचा भार, रात्री दहीहंडीच्या सरावाचा थरार! अंधेरीतील आंबोली दहीकाला पथकाचे पुन्हा आठ थरांचे लक्ष्य

लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालों की हार नहीं होती... लोकप्रिय हिंदी कवितेची ही ओळ अंधेरीतील आंबोली दहीकाला पथकाच्या बाबतीत चपखल बसते. प्रचंड मेहनत, विविध अडथळे आणि अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गतवर्षी या पथकाची स्वप्नपूर्ती झाली. अंधेरी पश्चिम येथील आठ थर लावणारे पहिले पथक ठरण्याचा मान त्यांनी मिळवला.
दिवसा नोकरीचा भार, रात्री दहीहंडीच्या सरावाचा थरार! अंधेरीतील आंबोली दहीकाला पथकाचे पुन्हा आठ थरांचे लक्ष्य
Published on

मुंबई : लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालों की हार नहीं होती... लोकप्रिय हिंदी कवितेची ही ओळ अंधेरीतील आंबोली दहीकाला पथकाच्या बाबतीत चपखल बसते. प्रचंड मेहनत, विविध अडथळे आणि अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गतवर्षी या पथकाची स्वप्नपूर्ती झाली. अंधेरी पश्चिम येथील आठ थर लावणारे पहिले पथक ठरण्याचा मान त्यांनी मिळवला. आता रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना यंदाही हे पथक गेल्या २४ वर्षांचा वारसा जपण्यासाठी आतुर आहे.

२००१मध्ये स्थापना करण्यात आलेल्या या पथकाने काही वर्षांपूर्वी सर्वात कमी बाळगोपाळांसह सात थर रचण्याचा पराक्रमही केला होता. कालांतराने स्पर्धा वाढत गेली व अंधेरीत अनेक गोविंदा पथके उदयास आली. मात्र अंधेरी पश्चिम येथील सर्वात जुने पथक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली दहीकाला पथकाने आपले वेगळेपण जपले. ‘यलो आर्मी, अंधेरीची शान’ या नावांनीही प्रसिद्ध असलेल्या या पथकात १० वर्षांच्या बालकापासून वयाची ६० वर्षे ओलांडलेले वरिष्ठही आनंदाने सहभागी होतात. अध्यक्ष प्रवीण कड्डी व प्रशिक्षक जितेंद्र मेस्त्री यांनी एकत्रितपणे पथकाची मोट बांधली असून यामध्ये प्रशांत चव्हाण, राजेश सोनवडेकर, हिम्मत इंगवले, विनोद धोके, संदीप बेंद्रे व चंद्रकांत मोहिते या मंडळींचेही मोलाचे योगदान आहे. यंदा २५वे वर्ष साजरे करताना या पथकाने पुन्हा एकदा कडक आठ थर लावण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे.

मात्र हे लक्ष्य गाठायचे असल्यास सराव किती महत्त्वाचा आहे, याकडे या पथकाच्या प्रशिक्षकांनी लक्ष वेधले आहे. “सरावातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खेळाडूची शारीरिक क्षमता. बेसच्या म्हणजेच सर्वात खालच्या थरातील बाळगोपाळांमध्ये आपल्या वजनाच्या दुप्पट भार उचलण्याची ताकद असणे आवश्यक आहे. थर लावण्यापेक्षा आपण ते कशाप्रकारे खाली उतरवतो, हे अधिक महत्त्वाचे असते. एक थर जरी वाढवायचा असला, तरी त्यासाठी तुम्हाला शिडीमध्ये आणि खाली पकडायला ३० ते ४० आणखी बाळगोपाळ लागतात. कोणत्याही खेळात आपण सरावाशिवाय पारंगत होऊ शकत नाही. जर दहीहंडीच्या दिवशी तुम्हाला सात थर लावायचे असतील, तर त्यापूर्वी सरावात तुम्ही किमान पाच ते सहा वेळा सात थर लावून उतरवणे गरजेचे आहे. यासाठीच दहीहंडीचा कमीत कमी दीड ते दोन महिना सराव आवश्यक असतो. कोणत्याही बाळगोपाळाला दुखापत होणार नाही, याची काळजी सरावात तसेच प्रत्यक्ष हंडीच्या दिवशी घेणे अधिक आवश्यक असते,” असे प्रशिक्षक मेस्त्री यांनी सांगितले.

सातत्याने सात थर लावणाऱ्या या पथकाला आठ थरांचे लक्ष्य गाठताना काही अडथळ्यांनाही सामोरे जावे लागले. सरावातील शिस्त हा त्यापैकीच एक महत्त्वाचा मुद्दा होता. पथकातील बाळगोपाळ आपापले कुटुंब आणि नोकरी सांभाळून दररोज रात्री २ तास सरावासाठी वेळ काढतात. मात्र अनेकदा वेळेवर सरावासाठी मुले उपलब्ध नसल्याने पथकाला संघर्ष करावा लागतो. अखेर २०२४मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले. बोरिवली पूर्व मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत पथकाने पहिल्याच प्रयत्नात आठ थर रचण्याची किमया साधली. आतासुद्धा हे पथक नव्या जोमाने सरावात मेहनत घेत असून प्रत्यक्षात दहीहंडीच्या दिवशी ते काय कमाल करणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

या पथकातर्फे सामाजिक उपक्रमही राबवले जातात. त्यामधील सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्तदान. त्याशिवाय आरोग्य शिबीर, पूरग्रस्त विभागातील नागरिकांना अन्नदान, अपंगांसाठी व्हिलचेअरची सुविधा, गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटपही पथकातर्फे केले जाते. तसेच पथकातील एखाद्या बाळगोपाळास गरज पडली, तर आर्थिक व वैद्यकीय मदतही करण्यात येते. त्याशिवाय पथकाचे अध्यक्ष प्रवीण कड्डी यांनी आमची स्पर्धा अन्य कोणत्याही पथकाशी नसून स्वत:शीच असल्याचे सांगत सर्व पथकांना आगामी दहीहंडीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यामुळेच संस्कृतीसह मैत्री व सामाजिक भान जपणाऱ्या या पथकाचे नाव दहीहंडी विश्वात आदराने का घेतले जाते, याची खात्री पटते.

पथकासाठी प्रत्येक बाळगोपाळ महत्त्वाचा!

२००१मध्ये जेव्हा आम्ही पथकाची सुरुवात केली, तेव्हा फक्त १५ ते २० बाळगोपाळ आमच्या पथकात होते. आज आमच्या बाळगोपाळांची संख्या २८० ते ३००च्या जवळ येऊन पोहोचली आहे. प्रशिक्षक म्हणून २५ वर्षे मागे सरून पाहताना पथकाने फार प्रगती केली आहे, असे वाटते. आंबोली हा परिसर फार मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक भागातील बाळगोपाळ एकत्रित आणून आम्ही हा उत्सव साजरा करतो. थरातील तसेच धरायला येणारा प्रत्येक बाळगोपाळ आमच्यासाठी मोलाचा आहे. आमच्या पथकातील मुले विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. कुणी पोलीस, कुणी सैन्यदलात, कुणी मीडियामध्ये, कुणी नोकरी, तर कुणी स्वत:चा व्यवसाय सांभाळत आहेत. प्रो गोविंदाच्या निमित्ताने आमचा एक बाळगोपाळ स्पेनमध्येही जाऊन आला. त्याशिवाय परिसरातील रहिवाशी आणि स्थानिक पोलिसांचे आम्हाला सातत्याने सहकार्य लाभते. या स‌र्वांमुळेच आजवर हे पथक टिकून आहे.

जितेंद्र मेस्त्री, प्रशिक्षक

logo
marathi.freepressjournal.in