लाहोर : डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मह आमिरचा तब्बल ४ वर्षांनी पाकिस्तानच्या टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात १८ एप्रिलपासून रंगणाऱ्या टी-२० मालिकेसाठी आमिरसह डावखुरा फिरकीपटू इमाद वासिमला पाकिस्तानच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
३१ वर्षीय आमिर २०२०मध्ये यापूर्वी अखेरचा टी-२० सामना खेळला होता. त्यानंतर आमिरने टी-२० प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. मग कालांतराने पाकिस्तानचा तत्कालीन कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाशी न जमल्याने आमिरने सर्व प्रकारांतून निवृत्ती पत्करली. मात्र आता पाकिस्तान क्रिकेट मंडळात झालेले बदल व नव्या निवड समितीच्या सांगण्यावरून आमिर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळणार आहे. दरम्यानच्या काळात तो विविध टी-२० लीगमध्ये खेळत होता. दुसरीकडे इमादने नोव्हेंबर, २०२३ मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. मात्र पीएसएलमध्ये त्याने चमकदार कामगिरी करून संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे त्याचेही संघात पुनरागमन झाले आहे.
पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, इमाद वासिम, फखर झमान, मोहम्मद आमिर, सय्यम अयुब, शादाब खान, इरफान खान, इफ्तिकार अहमद, आझम खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, झमन खान, अब्बास आफ्रिदी, अब्रार अहमद, उसामा मीर.