
न्यूपोर्ट (अमेरिका) : भारताचे महान टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज यांनी रविवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. या दोन्ही खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात येणारे हे आशिया खंडातील पहिलेच दोन टेनिसपटू ठरले आहेत.
५१ वर्षीय पेसने १९९६च्या ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत कांस्यपदक पटकावले होते. तसेच त्याच्या नावावर दुहेरीत आठ व मिश्र दुहेरीत १० ग्रँडस्लॅम जेतेपदे जमा आहेत. त्याशिवाय डेव्हिस चषक स्पर्धेतही त्याने अनेक जेतेपदे काबिज केली आहेत. दुसरीकडे ७० वर्षीय अमृतराज यांनी विम्बल्डन व अमेरिकन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत दोन वेळा धडक मारली होती. त्याशिवाय १९७४ आणि १९८७मध्ये भारताला डेव्हिस चषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारून दिली. एकेरीत ते एकेकाळी जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानापर्यंत पोहोचले होते.
“केवळ खेळातील महान व्यक्तींबरोबरच नाही, तर आयुष्यातील प्रत्येक दिवशी मला प्रेरणा देणाऱ्या माणसांसह या मंचावर असताना हा बहुमान स्वीकारणे फार अभिमानाची गोष्ट आहे. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कठोर परिश्रम करता, असे माझे वडील नेहमी म्हणतात. तुम्ही हे केवळ बक्षीस आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी नाही, तर जगाला प्रेरणा देण्यासाठी करता. सात ऑलिम्पिकमध्ये देशवासीयांसाठी खेळणे, त्या सर्व डेव्हिस चषकांमध्ये राष्ट्रगीतासाठी उभे राहणे आणि आपण आशियाई ग्रँडस्लॅम जिंकू शकतो, आपल्या प्रदेशात प्रथम क्रमांक मिळवू शकतो हे सिद्ध करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती,” असे पेस यावेळी म्हणाला.
“हा केवळ माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या पालकांसाठी नव्हे, तर जगभरात विविध ठिकाणी राहणाऱ्या माझ्या सर्व भारतीयांसाठी आणि माझ्या देशाचा सन्मान आहे. या अविश्वसनीय आणि विशिष्ट समूहात सामील होण्याची मला संधी लाभली हे भाग्यच,” असे अमृतराज म्हणाले.