कोट्यवधी भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यास आतुर! पॅरिस ऑलिम्पिकसाठीचा ध्वजवाहक अचंता शरथ कमलची ‘नवशक्ति’ला खास मुलाखत

पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून माझी नेमणूक करण्यात आल्याचे समजताच मला अश्रू अनावर झाले. २२ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचे हे जणू फलित आहे.
कोट्यवधी भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यास आतुर! पॅरिस ऑलिम्पिकसाठीचा ध्वजवाहक अचंता शरथ कमलची ‘नवशक्ति’ला खास मुलाखत
File Photo
Published on

ऋषिकेश बामणे/मुंबई

पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून माझी नेमणूक करण्यात आल्याचे समजताच मला अश्रू अनावर झाले. २२ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचे हे जणू फलित आहे. त्यामुळे २६ जुलै रोजी कोट्यवधी भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यास मी आतुर आहे, अशा शब्दांत भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

२६ जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ११७ खेळाडू पदकांसाठी सर्वस्व पणाला लावतील. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यातील संचलनात ४२ वर्षीय शरथ व बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू भारताचे ध्वजवाहक असणार आहेत. शरथच्या कारकीर्दीतील ही पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. त्याशिवाय स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताचे पुरुष व महिला संघ टेबल टेनिसच्या सांघिक प्रकारातही खेळताना दिसतील. कारकीर्दीतील चढउतार, आगामी आव्हाने, भारतातील बदलते क्रीडा क्षेत्र आणि ध्वजवाहकाच्या भूमिकेसह त्याच्यावरील जबाबदारी यांसारख्या विविध मुद्द्यांवर या निमित्ताने शरथने दैनिक ‘नवशक्ति’शी केलेली ही खास बातचीत.

भारताचा ध्वजवाहक म्हणून नेमणूक करण्यात आल्यावर तुझी प्रतिक्रिया काय होती?

लहान मुलगा जेव्हा एखाद्या खेळात कारकीर्द घडवण्याचा विचार करतो, तेव्हा त्या क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभावी, हेच त्याचे स्वप्न असते. गेली २२ वर्षे मी टेबल टेनिसमध्ये भारतासाठी नाव कमावत आहे. त्याचेच फळ म्हणून माझी ध्वजवाहकाच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली असावी. मात्र, जेव्हा मला हे प्रथम समजले, तेव्हा काही क्षणांसाठी मी भावुक झालो. माझा यावर विश्वासच बसत नव्हता. कारकीर्दीतील पाचव्या आणि अखेरच्या ऑलिम्पिकमध्ये कोट्यवधी भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यास मी आतुर असून देशाला पदक जिंकवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

ऑलिम्पिकसाठी भारतीय टेबल टेनिस संघाची तयारी कशी सुरू आहे?

निश्चितच यंदा आमची तयारी उत्तम झाली आहे. भारताचे दोन्ही संघ सांघिक प्रकारात प्रथमच खेळणार आहेत. ही फार अभिमानास्पद बाब असून यावरून देशात टेबल टेनिसची प्रगती होत आहे, हे अधोरेखित होते. ज्ञानशेखरन साथियनसारख्या अनुभवी खेळाडूला मुख्य संघात स्थान लाभलेले नाही. म्हणजेच युवा फळीही पूर्ण लयीत आहे, हे स्पष्ट होते. चीन, जपान या देशांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यात आम्ही सज्ज आहोत. ऑलिम्पिकदरम्यान आम्ही जेथे राहणार आहोत, तेथेच नीरज चोप्रा, पी. व्ही. सिंधू असे तारांकित खेळाडूही असल्याने युवांना त्यांच्याकडून आणखी मार्गदर्शन लाभेल.

यंदा भारतीय संघ पदकांचे दशक गाठू शकेल का?

यंदा आपण नक्कीच १० पेक्षा अधिक ऑलिम्पिक पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवू, याची मला खात्री आहे. विविध खेळांत असंख्य गुणवान क्रीडापटू आपल्याला गवसले आहेत. बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती, भालाफेक, ॲथलेटिक्स, टेनिस या सर्वच क्रीडा प्रकारांत भारताने गेल्या काही वर्षांत लक्षवेधी कामगिरी केली आहे. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकपासून प्रेरणा घेत युवा पिढी क्रीडा क्षेत्राकडे वळत आहे. याचा परिणाम आपल्याला दिसून येत आहे.

तुझ्या आतापर्यंतच्या ऑलिम्पिक अनुभवाद्वारे युवा पिढीला काय संदेश देशील?

माझ्या कारकीर्दीतील पाचव्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पदक जिंकवून देण्याचे माझे मुख्य लक्ष्य आहे. मात्र यापूर्वीच्या ऑलिम्पिकमध्ये अपयश आल्यावरही मी हार मानली नाही. अनेकदा दुखापती तसेच सुमार कामगिरीच्या गर्तेतही मी अडकलो. मात्र माझे प्रशिक्षक, कुटुंब, सहकारी या काळात माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे युवा पिढीनेसुद्धा संयम ढासळू न देता प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. यश कधी ना कधी मिळतेच.

शरथविषयी हे माहीत आहे का?

  • २००२ मध्ये भारताकडून खेळणाऱ्यास प्रारंभ करणाऱ्या शरथने २००४, २००८, २०१६, २०२० अशा चार ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

  • शरथच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरीत दोन सुवर्णपदके आणि एक कांस्यपदक जमा आहे. तसेच तीन वेळा सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता.

  • आशियाई स्पर्धेतही शरथने सांघिक आणि मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले आहे.

  • यंदा ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकापैकी रोहन बोपण्णानंतर (४४ वर्षे) शरथ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे.

logo
marathi.freepressjournal.in