अनंतजीत-महेश्वरी जोडीला अवघ्या एका गुणाचा फटका; कांस्यपदकाच्या लढतीत चीनकडून ४४-४३ असा पराभव

नेमबाजीतील स्कीट प्रकारात अनंतजीत सिंग नारुका आणि महेश्वरी चौहान या भारतीय जोडीला कांस्यपदकावर अवघ्या एका गुणाच्या फरकामुळे पाणी सोडावे लागले.
अनंतजीत-महेश्वरी जोडीला अवघ्या एका गुणाचा फटका; कांस्यपदकाच्या लढतीत चीनकडून ४४-४३ असा पराभव
AFP | Reuters
Published on

चेटेरॉक्स (फ्रान्स) : नेमबाजीतील स्कीट प्रकारात अनंतजीत सिंग नारुका आणि महेश्वरी चौहान या भारतीय जोडीला कांस्यपदकावर अवघ्या एका गुणाच्या फरकामुळे पाणी सोडावे लागले. चेटेरॉक्स येथील नेमबाजी प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत अनंतजीत व महेश्वरी यांना चीनच्या जोडीने ४४-४३ असे नमवले.

भारताने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये अद्याप तीन पदके कमावली असून ही तिन्ही पदके नेमबाजीतील आहेत. त्यामुळे स्कीटमधील मिश्र सांघिक प्रकारात अनंतजीत व महेश्वरी यांच्याकडूनही चाहत्यांना काहीशा अपेक्षा होत्या. यावर खरे उतरताना पात्रता फेरीत भारतीय जोडीने चौथे स्थान मिळवले. त्यांनी ५०पैकी ४६ गुण त्यावेळी प्राप्त केले.

त्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत मात्र चीनच्या यिटींग जियांग व जिनलीन ल्यू यांच्याविरुद्ध भारतीय जोडीला ४३ गुण कमावता आले, तर चीनने अखेरच्या नेममध्ये बाजी मारताना ४४ गुण प्राप्त केले. याबरोबरच भारताचे ऑलिम्पिकमधील नेमबाजीतील अभियान समाप्त झाले.

स्कीटमधील चौथ्या स्थानामुळे भारताला नेमबाजीत आणखी एका पदकाने हुलकावणी दिली, असे म्हणू शकतो. अर्जुन बबुता, मनू यांनाही एका प्रकारात चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेने मात्र ऐतिहासिक कांस्यकमाई केली होती.

logo
marathi.freepressjournal.in