अनिकेतकडे मुंबई खिलाडीजचे नेतृत्व! अल्टिमेट खो-खोच्या दुसऱ्या हंगामासाठी महेश शिंदे मुंबईच्या उपकर्णधारपदी

अनिकेतच्या निवडीबाबत संघमालक पुनित बालन म्हणाले की, “अनिकेतची दुसऱ्या हंगामासाठी कर्णधार म्हणून निवड करणे ही एक धोरणात्मक निवड होती.
अनिकेतकडे मुंबई खिलाडीजचे नेतृत्व! अल्टिमेट खो-खोच्या दुसऱ्या हंगामासाठी महेश शिंदे मुंबईच्या उपकर्णधारपदी
PM
Published on

भुवनेश्वर : अल्टिमेट खो-खो लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी मराठमोळ्या तसेच राज्य शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या अनिकेत पोटेची मुंबई खिलाडीज संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २४ डिसेंबर ते १३ जानेवारीदरम्यान ओडिशा येथे रंगणाऱ्या या स्पर्धेत अनुभवी महेश शिंदे मुंबईचे उपकर्णधारपद भूषवताना दिसेल.

वर्षाच्या सुरुवातीला आशियाई खो-खो स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकवून देण्यात २६ वर्षीय अनिकेतने मोलाची भूमिका बजावली. अल्टिमेट खो-खोच्या पहिल्या पर्वात गुजरातकडून खेळताना अनिकेतने छाप पाडली होती. अनिकेतच्या नावावर भारताकडून खेळताना ८ सुवर्ण व ५ रौप्यपदके जमा आहेत. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रासाठीही तो सातत्याने योगदान देतो.

अनिकेतच्या निवडीबाबत संघमालक पुनित बालन म्हणाले की, “अनिकेतची दुसऱ्या हंगामासाठी कर्णधार म्हणून निवड करणे ही एक धोरणात्मक निवड होती. पहिल्या पर्वात त्याने मॅटवर ज्या पद्धतीने नेतृत्वगुण प्रदर्शित केले, त्यामुळे त्याची या भूमिकेसाठी नैसर्गिक निवड झाली. एक स्थानिक मुलगा असल्याने त्याला मुंबई शहराची भावना देखील समजली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्याचा अनुभव संघाला पुढे घेऊन जाईल.

कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर अनिकेत म्हणाला की, “माझ्यासाठी हा एक अनपेक्षित निर्णय होता, पण ही संधी मिळाल्याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे. संघ व्यवस्थापनाच्या विश्वासाची परतफेड करण्यासाठी आणि मुंबई संघाला उंचीवर नेण्यासाठी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन.” मुंबईचे खेळाडू सध्या मुख्य प्रशिक्षक विकास सूर्यवंशी व सहाय्यक प्रशिक्षक नितूल दास यांच्या मार्गदर्शनाखाली बिजू पटनायक इनडोअर स्टेडियम, भुवनेश्वर येथे सराव शिबिरात मेहनत घेत आहेत. २४ डिसेंबरला तेलुगू योद्धा संघाविरुद्ध मुंबई सलामीची लढत खेळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in