अंकुर स्पोर्ट्स क्लब अजिंक्य, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

श्री साई क्रीडा मंडळातर्फे आयोजित प्रथम श्रेणी गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सातरस्ता येथील अंकुर स्पोर्ट्स क्लबने विजेतेपदाचा चषक उंचावला.
अंकुर स्पोर्ट्स क्लब अजिंक्य, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

मुंबई : श्री साई क्रीडा मंडळातर्फे आयोजित प्रथम श्रेणी गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सातरस्ता येथील अंकुर स्पोर्ट्स क्लबने विजेतेपदाचा चषक उंचावला. अंकुर संघाच्याच अभिमन्यू पाटीलला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

मफतलाल कम्पाऊंड, लोअर परेल येथे झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात अंकुर क्लबने ना. म. जोशी मार्ग येथील लायन्स स्पोर्ट्स क्लबला ३०-२२ असे पराभूत केले. अंकुर क्लबला ११ हजार तसेच चषक देऊन गौरवण्यात आले. अनिल घाटे यांनी अंकुर संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. उपविजेत्या लायन्स संघाला ८ हजारांसह चषद देण्यात आला. मध्यांतराला अंकुर क्लबने १७-१२ अशी आघाडी मिळवली होती. त्यांच्या विजयात अभिमन्यूच्या चढायांना सिद्धेश तटकरे व अभिषेक भोसले यांच्या पकडींची उत्तम साथ लाभली. लायन्स संघाकडून हर्ष मोरे, ऋषिकेश कणेकरने चांगला खेळ केला.

सिद्धेश स्पर्धेतील सर्वोत्तम बचावपटू, तर हर्ष सर्वोत्तम चढाईपटू ठरला. उपांत्य सामन्यात अंकुर क्लबने विजय क्लबला ३९-२४ अशी, तर लायन्स क्लबने अमर मंडळाला ३७-२४ अशी धूळ चारली होती. उपांत्य लढतीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी ५ हजार व चषक प्रदान करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in