कबड्डीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या खेळाडूंना महत्वाचा पुरस्कार जाहीर

यंदा तीन वर्षाचे पुरस्कार एकत्रित जाहीर करून कोरोनामुळे राहिलेला अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न संघटनेकडून करण्यात आला आहे.
कबड्डीसाठी  उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या खेळाडूंना महत्वाचा पुरस्कार जाहीर

कबड्डीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मिनानाथ धानजी (२०१९-२०), शशिकांत राऊत (२०२०-२१) या मुंबई शहरच्या कार्यकर्त्याबरोबर परभणीच्या भारत धनले (२०२१-२२) यांना स्व. रमेश देवाडीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा श्रमयोगी कार्यकर्ता हा महत्वाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जाहीर झालेले पुरस्कार कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या जन्मदिनी म्हणजे १५ जुलै रोजी वितरित केले जातील, असे माहिती राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने प्रतिवर्षी कबड्डीमहर्षी स्व. बुवा साळवी यांचा जन्मदिन कबड्डी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कबड्डीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू, कार्यकर्ते, पंच, क्रीडा-पत्रकार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा तीन वर्षाचे पुरस्कार एकत्रित जाहीर करून कोरोनामुळे राहिलेला अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न संघटनेकडून करण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या प्रा. संभाजी पाटील (२०२१-२२), मुंबई शहरच्या सुधीर खानोलकर (२०१९-२०) व डॉ. रत्नाकर गुट्टे-परभणी यांना कृतज्ञता पुरस्कार, तर पत्रकारितेसाठी अजित पाटील (२०१९-२०), जयेंद्र लोंढे (२०२०-२१), विनायक राणे (२०२१-२२) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुंबई शहरच्या पंकज मोहितेची स्व. मधुसूदन पाटील, तर साताऱ्याची सोनाली हेळवीची अरुणा साटम २०१९-२० यावर्षाच्या पुरस्कारासाठी, तर २०२०-२१ यावर्षाच्या स्व. मधुसुदन पाटील पुरस्काराकरिता ठाण्याच्या निलेश साळुंखेची आणि स्व. अरुणा साटम पुरस्काराकरिता मुंबई शहराची पूजा यादवची निवड करण्यात आली आहे.

वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूस स्व. मल्हारपंत बावचकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन २०१९-२०ची देण्यात येणारी शिष्यवृत्ती रत्नागिरीच्या शुभम शिंदे, मुंबई शहरच्या पौर्णिमा जेधे यांना, २०२०-२१ची परभणीच्या निकिता लंगोटे हिला, तर सन २०२१-२२ची अहमदनगरच्या शंकर गदई व पुण्याच्या अंकिता जाधव यांना देण्यात येणार आहे.

२०१९ ला झालेल्या राज्य पंच परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सिंधुदुर्गच्या राजेश सिंगनाथ यांना स्व.वसंतराव कोलगावकर सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहे.

उत्कृष्ट स्पर्धा आयोजक जिल्हा म्हणून रत्नागिरी व चिपळूण तालुका कबड्डी असो.( २०१९-२०), परभणी जिल्हा कबड्डी असो. व साई सेवा क्रीडा मंडळ (२०२०-२१), तर ठाणे जिल्हा कबड्डी असो. व हिंदवी युवा प्रतिष्ठाण (२०२१-२२) यांना गौरविण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in