ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार अॅरोन फिंचने शनिवारी वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात फिंच ऑस्ट्रेलियाच्या वन-डे संघाचे शेवटचे नेतृत्व करणार आहे; मात्र टी-२० मध्ये फिंच संघाचा कर्णधार असेल.
फिंच गेल्या काही दिवसांपासून खराब फॉममध्ये आहे. वन-डे सामन्यांमध्ये फिंचची कामगिरी खालावली. गेल्या ७ डावात त्याने एकूण २६ धावा केल्या. त्यात तो तीन वेळा शून्यावर बाद झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत त्याला दोन्ही डावात केवळ ५ धावा करता आल्या.
३६ वर्षाच्या फिंचने कारर्कीदीत १४५ सामने खेळले आहेत. त्याने ५४०१ धावा केल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत १७ शतके झळकाविली आहेत.
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचं कर्णधार पद अॅरोन फिंचकडे सोपवण्यात आले आहे. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी तो ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. याशिवाय २०२० मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाचा ‘मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारही मिळाला. फिंचने वन-डे क्रिकेटमधून अचानक जाहीर केलेल्या या निवृत्तीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.