अंशुल कंबोज भारतीय संघात सामील; दुखापतीमुळे आकाश दीप, अर्शदीप सिंग यांच्या खेळण्याबाबत साशंकता

इंग्लंडविरुद्ध २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या मालिकेतील चौथ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. दुखापतीमुळे आकाश दीप आणि अर्शदीप सिंग यांच्या संघातील उपस्थितीबाबत साशंकता आहे. त्यामुळे निवडकर्त्यांनी कंबोजला बोलावले आहे.
अंशुल कंबोज भारतीय संघात सामील; दुखापतीमुळे आकाश दीप, अर्शदीप सिंग यांच्या खेळण्याबाबत साशंकता
Photo : X (BCCI)
Published on

मँचेस्टर : इंग्लंडविरुद्ध २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या मालिकेतील चौथ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. दुखापतीमुळे आकाश दीप आणि अर्शदीप सिंग यांच्या संघातील उपस्थितीबाबत साशंकता आहे. त्यामुळे निवडकर्त्यांनी कंबोजला बोलावले आहे.

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळलेल्या आकाश दीपला दुखापत झाली आहे. आकाश दीपच्या उपस्थितीबाबत अद्याप स्पष्टता नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आतापर्यंत मालिकेत एकही सामना खेळलेला नाही. दुखापतीमुळे अर्शदीप मँचेस्टर कसोटीत उपलब्ध असण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे निवडकर्त्यांनी कंबोजला बोलावल्याचे, समजते.

गुरुवारी सराव सत्रात साई सुदर्शनने मारलेला फटका अडवताना अर्शदीपच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या डाव्या हाताला पट्टी बांधली आहे.

अर्शदीपच्या परिस्थितीवर पुढच्या काही गोष्टी अवलंबून असतील, असे भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेटे म्हणाले.

गोलंदाजी करताना त्याने चेंडू हातात घेतला. त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. ते किती गंभीर आहे ते पाहावे लागेल. वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्याच्या हाताला टाके मारण्याची गरज आहे किंवा नाही याच्यावर आमचे पुढचे नियोजन ठरेल, असे रायन म्हणाले.

अँडरसन- तेंडुलकर कसोटी मालिकेतील ३ सामने झाले असून इंग्लंडचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील उर्वरित २ सामने व्हायचे आहेत. चौथा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा आहे. २४ वर्षीय कांबोज याने इंग्लंड लायन्सविरुद्ध 'इंडिया ए' संघात प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. कसोटी मालिकेपूर्वी नॉर्थम्प्टन आणि कँटरबरी येथे झालेल्या दोन सामन्यांत त्याने चार डावांमध्ये एकूण पाच बळी घेतले. या सामन्यांत त्याने स्विंग, उसळी अशा माऱ्याचा वापर केला. गेल्या वर्षी केरळविरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्यात खेळताना कंबोजने एका डावात सर्व १० बळी घेतले होते. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका डावात १० बळी घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. रणजीच्या मागील हंगामात कंबोजने एकूण सहा सामन्यांत ३४ बळी घेतले होते. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची ही शानदार कामगिरी आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून मँचेस्टर येथे खेळला जाणार आहे. आतापर्यंत झालेले तीनपैकी २ सामने जिंकून यजमान इंग्लंडचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. चौथ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा आहे.

logo
marathi.freepressjournal.in