‘पीसीबी’च्या धमकीला अनुराग ठाकूर यांचे प्रत्युत्तर ; पाकिस्तानला जाण्याबाबतचा निर्णय गृह मंत्रालयावर अवलंबून

भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूची सुरक्षा महत्त्वाची आहे. पाकिस्तानातील सुरक्षेविषयी मी फारसे बोलू इच्छित नाही
‘पीसीबी’च्या धमकीला अनुराग ठाकूर यांचे प्रत्युत्तर ; पाकिस्तानला जाण्याबाबतचा निर्णय गृह मंत्रालयावर अवलंबून

गेल्या काही वर्षांत भारत देश हा क्रिकेटमध्ये महाशक्ती म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे भारताला डावलणे अन्य देशांना महागात पडू शकते, अशा शब्दांत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळावर (पीसीबी) निशाणा साधला. तसेच पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघाला पाठवायचे की नाही, यासंबंधीचा निर्णय सर्वस्वीपणे गृह मंत्रालय घेईल, असेही ठाकूर यांनी सांगितले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वीच २०२३मध्ये पाकिस्तान येथे होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघ जाणार नाही, असे जाहीर केले. त्यानंतर पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनीही पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून माघार घेण्याचा इशारा दिला. त्याशिवाय भारताने आशिया चषकासाठी नकार दर्शवून चुकीचा पायंडा पाडू नये, असे सांगितले. यासंबंधी अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी मत मांडले.

“विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक संघाचे भारतात स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पाकिस्तानचा संघही गेल्या १०-१२ वर्षांत भारतात खेळून गेला आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने भारताने काय करावे, हे सांगू नये. भारत आज क्रिकेटमध्ये महासत्ता बनला असून भारताला डावलणे अन्य देशांना कठीण जाईल,” असे अनुराग ठाकूर म्हणाले. २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ एकदाही पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही.

खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची!

गृह मंत्रालय भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्याची शक्यता तशी कमीच आहे. मात्र परवानगी मिळाली तरी खेळाडूंच्या मानसिक स्थितीचा आम्ही आढावा घेऊ, असे ठाकूर यांनी सांगितले. “भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूची सुरक्षा महत्त्वाची आहे. पाकिस्तानातील सुरक्षेविषयी मी फारसे बोलू इच्छित नाही,” असे ठाकूर म्हणाले. त्याशिवाय मध्य प्रदेश येथे ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान खेलो इंडिया यूथ गेम्सचा पुढील हंगाम खेळवण्यात येईल, असे ठाकूर यांनी जाहीर केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in