दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषक दरम्यान महिला क्रिकेटचे चित्र बदलणार आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राचा लिलाव आज मुंबईत होणार आहे. त्यामुळे याकडे सर्व जगाचे लक्ष असेल. महिला आयपीएल लिलावात एकूण 409 खेळाडू आपले नशीब आजमावतील. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, यूपी वॉरियर्स असे पाच संघ खेळणार आहेत. खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्व 5 फ्रँचायझींकडे एकूण 60 कोटी रुपये आहेत. स्मृती मानधना आणि हरमन कौर यांच्याशिवाय अन्य दोन खेळाडूंनाही लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
पुढील महिन्यात 4 ते 26 मार्च दरम्यान महिला आयपीएल खेळवण्यात येणार आहे. महिलांच्या आयपीएल लिलावात सर्वाधिक आधारभूत किंमत 50 लाख रुपये आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना यांच्याशिवाय आणखी 8 भारतीय खेळाडूंचा या आधारभूत किमतीच्या यादीत समावेश आहे. 50 लाखांच्या मूळ किमतीत एकूण 24 खेळाडूंचा समावेश आहे. लिलावात या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी प्रत्येक संघ उत्सुक असेल.