Copa America: अपराजित अर्जेंटिनाची हॅट्‌ट्रिक! मार्टिनेझच्या बहुमूल्य गोलमुळे अंतिम फेरीत कोलंबियावर १-० अशी मात

Copa America Football Final: लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अर्जेंटिनाने रविवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे) गेल्या चार वर्षांत सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय जेतेपदाला गवसणी घातली.
Copa America: अपराजित अर्जेंटिनाची हॅट्‌ट्रिक! मार्टिनेझच्या बहुमूल्य गोलमुळे अंतिम फेरीत कोलंबियावर १-० अशी मात
@FIFAWorldCup/X
Published on

Lionel Messi: मियामी : १० जुलै, २०२१. १८ डिसेंबर, २०२२ नंतर आता १४ जुलै, २०२४ ही तारीखसुद्धा अर्जेंटिना फुटबॉलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अर्जेंटिनाने रविवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे) गेल्या चार वर्षांत सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय जेतेपदाला गवसणी घातली. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लॉटारो मार्टिनेझने केलेल्या निर्णायक गोलमुळे गतविजेत्या अर्जेंटिनाने कोलंबियाला १-० असे पराभूत केले. त्यांनी विक्रमी १६व्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला, हे विशेष.

मियामी येथील हार्ड-रॉक स्टेडियमवर प्रेक्षकांनी केलेली गर्दी तसेच गदारोळमुळे सामना तासभर उशिराने सुरू झाला. अखेर चाहत्यांवर नियंत्रण मिळविल्यावर खेळाडूंनी सरावाला प्रारंभ केला आणि थोड्याच वेळात लढतही सुरू झाली. २०२१मध्ये मेस्सीच्याच नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने ब्राझीलला नमवून कोपा अमेरिकाचे १५व्यांदा जेतेपद पटकावले होते. त्यामुळे अर्जेंटिना व उरुग्वे यांच्यात बरोबरी होती. अखेर सोमवारी अर्जेंटिनाने एक पाऊल आणखी पुढे टाकताना त्यांचे वर्चस्व सिद्ध केले.

लढतीच्या पहिल्या मिनिटापासूनच दोन्ही संघांत चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी कडवा संघर्ष पाहायला मिळाला. याच दरम्यान मेस्सी चेंडूवर ताबा मिळवताना खाली पडलेलाही दिसला. पहिल्या सत्रात कुणासही गोल करता आला नाही. दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघांमध्ये संघर्ष कायम होता. कारकीर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा ३६ वर्षीय एँजेल डी मारिया बचावात उत्तम कामगिरी बजावत होता. मात्र याचदरम्यान ६६व्या मिनिटाला मेस्सी पुन्हा एकदा खाली कोसळल्याने त्याला अखेर मैदान सोडावे लागले. यावेळी मेस्सीच्या पायाला सूज आल्याचेही दिसत होते. ९०व्या मिनिटापर्यंतही गोलशून्य बरोबरी कायम राहिल्याने अतिरिक्त वेळेपर्यंत सामना लांबला.

तेथे मग ९६व्या मिनिटाला मार्टिनेझचे बदली खेळाडू म्हणून मैदानावर आगमन झाले. मार्टिनेझनेच या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक ४ गोल केले होते. अखेर ११२व्या मिनिटाला जिओवानी लो सेल्सोच्या पासवर मार्टिनेझनेच अप्रतिम गोल नोंदवून अर्जेंटिनाचे खाते उघडले. त्याचा हा कारकीर्दीतील २९वा गोल ठरला. तसेच त्याने मेस्सीलाही आलिंगन दिले.

मग उर्वरित ८ मिनिटे अर्जेंटिनाने कोलंबियाला रोखून ठेवत १-० असा विजय साकारला आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. २००१मध्ये जेतेपद मिळवल्यानंतर २३ वर्षांनी अंतिम फेरी गाठणाऱ्या कोलंबियाला मात्र जेतेपदाने हुलकावणी दिल्याने त्यांना निराशा लपवता आला नाही.

> अर्जेंटिनामध्ये रविवारी रात्रभर चाहत्यांनी एकत्रित येत या विजयाचा जल्लोष केला. ब्युनस आयर्स येथे लाखोंची गर्दी जमली होती. तसेच डी मारिया आणि मेस्सी यांचे मोठे कटआऊटही चाहत्यांनी ठिकठिकाणी उभे केले होते.

> अर्जेंटिनाने विक्रमी १६ वेळा कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद मिळवले. उरुग्वे या यादीत १५ जेतेपदांसह दुसऱ्या स्थानी आहे.

> अर्जेंटिना हा सलग तीन आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा जिकंणारा विश्वातील दुसराच संघ ठरला आहे. यापूर्वी स्पेनने २००८मध्ये युरो, २०१०मध्ये फिफा विश्वचषक, तर २०१२मध्ये पुन्हा युरो चषकाचे जेतेपद मिळवले होते.

मेस्सीला दुखापत

अर्जेंटिनाच्या मेस्सीला या लढतीदरम्यान दुखापत झाल्याने तो मैदानाबाहेर गेला. यावेळी कॅमेरामनने त्याच्या पायाजवळ लक्ष केंद्रित केले असता मेस्सीच्या डाव्या पायाला सूज आल्याचे दिसले. त्यामुळे पुढील काही आठवडे तो खेळताना दिसणार नाही.

अर्जेंटिना-स्पेनमध्ये लवकरच लढत

आता कोपा अमेरिकाचे विजेते अर्जेंटिना आणि युरो स्पर्धेचे विजेते स्पेन यांच्यात लवकरच ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’ म्हणजेच ‘फायनलसिमा’ ही लढत खेळविण्यात येईल. आतापर्यंत १९८५, १९९३ व २०२२मध्ये ही स्पर्धा झाली होती. २०२२मध्ये कोपाचे विजेते अर्जेंटिना व युरो चषकाचे विजेते इटली यांच्यातील लढतीत अर्जेंटिनाने बाजी मारली होती. त्यामुळे आता स्पेन त्यांना रोखणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

पुरस्कार विजेते

  • गोल्डन बूट (स्पर्धेत सर्वाधिक गोल) : लॉटारो मार्टिनेझ (५)

  • गोल्डन ग्लोव्ह्ज (सर्वोत्तम गोलरक्षक) : इमिलिआनो मार्टिनेझ

  • स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : जेम्स रॉड्रिगेज (कोलंबिया)

  • अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : अँजेल डी मारिया

logo
marathi.freepressjournal.in