नवी दिल्ली : विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीला भारतात ‘याची देही, याची डोळा’ खेळताना पाहण्याचे तमाम चाहत्यांचे स्वप्न कदाचित अपुरेच राहणार. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) मेस्सीच्या विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाचा खर्च परवडत नसल्याने त्यांच्या आशिया दौऱ्यातील लढती आता भारताबाहेरच खेळवण्यात येणार आहेत. अर्जेंटिनाने भारताकडे ४० कोटी रुपयांची मागणी केली होती.
अर्जेंटिनाने गतवर्षी आशिया खंडातील कतार येथे झालेल्या फिफा विश्वचषकावर नाव कोरले. यावेळी त्यांना आशियातून फुटबॉलप्रेमींचा सर्वाधिक पाठिंबा लाभला. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघ आशिया दौऱ्यात प्रामुख्याने भारतात एक लढत खेळण्यास आतुर होता. त्यानुसार त्यांनी एआयएफएफशी संपर्क साधून त्यांचा प्रस्तावही मांडला. मात्र यासाठी अर्जेंटिनाने ४५ ते ५० लाख डॉलर (३५ ते ४० कोटी रुपये) मागितले. तितकी रक्कम देण्यास भारतीय महासंघाने नकार दर्शवला आहे.
दरम्यान, भारतीय संघ क्रमवारीत अर्जेंटिनापेक्षा फार मागे असल्याने ही लढत भारत-अर्जेंटिनामध्ये झाली नसती. अखेर बीजिंग आणि जकार्ता येथे हे सामने खेळवण्यात येणार असून अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया व इंडोनेशियाशी दोन हात करणार आहे. अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकल्यापासून त्यांना आपल्या देशात खेळण्यासाठी आमंत्रित करावे, यासाठी असंख्य देश प्रयत्नशील आहेत.
अर्जेंटिना फुटबॉल महासंघाने आमच्याशी संपर्क साधला होता. मात्र या सामन्यासाठी आवश्यक असलेली रक्कम उभारणे अशक्य होते. यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा प्रायोजकाची आम्हाला गरज होती. भारतातील फुटबॉलला काही आर्थिक मर्यादा आहेत. त्यामुळे आम्हाला अर्जेंटिनाला नकार द्यावा लागला.
- शाजी प्रभाकरन, एआयएफएफचे सचिव
२०११नंतर प्रथमच आला असता योग
२०११मध्ये अर्जेंटिनाचा संघ व्हेनेझुएलाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यावेळी कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या त्या लढतीत अर्जेंटिनाने १-० असा विजय मिळवला. यानिमित्ताने जवळपास ७५ हजार चाहत्यांनी स्टेडियममधून मेस्सीचा खेळाचा आनंद लुटला. मात्र त्यावेळी अर्जेंटिनाचा संघ जगज्जेता नव्हता, तसेच त्या तुलनेत आता म्हणजेच जवळपास १२ वर्षांनी मेस्सीचा भारतातील चाहता वर्ग दुपट्टीने वाढला आहे. त्यामुळे २०११नंतर प्रथमच मेस्सीला भारतात खेळताना पाहण्याचा योग जुळून आला असता.