श्यामकेंत (कझाकस्तान) : भारताच्या अर्जुन बबुटा आणि इलाव्हेनिल वालारिवन जोडीने १६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात शनिवारी सोनेरी यश संपादन केले.
भारताच्या अर्जुन-इलाव्हेनिल जोडीने डिंग्के लू आणि क्झिन्लू पेंग या चीनच्या जोडीला १७-११ असे पराभूत करत सुवर्ण पदक आपल्या नावे केले. या जोडीने शानदार समन्वयाचे दर्शन घडवत भारताला सोनेरी यश मिळवून दिले.
सुरुवातीच्या फेऱ्यांत चीनची जोडी आघाडीवर होती. भारतीय जोडीने सुरुवातीला ९.५ आणि १०.१ असे गुण मिळवले. मात्र त्यानंतर अर्जुन-इलाव्हेनिल जोडीने जोरदार पुनरागमन करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
तमिळनाडूची इलाव्हेनिल आणि पंजाबची २६ वर्षीय बबुटा यांनी स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येकी २ सुवर्ण पदके जिंकली आहेत.
इलाव्हेनिलने महिला गटात १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे. बबुटाने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रुद्रांश पाटील आणि किरण जाधव यांच्यासह सांघिक सुवर्ण पदक पटकावले आहे.
पात्रता फेरीत भारतीय संघाने चीनच्या दोन संघांनंतर तिसरे स्थान पटकावले होते. पण नियमांनुसार एका देशाचा एकच संघ अंतिम फेरीस पात्र ठरतो. त्यामुळे चीनचा टांग हुईकी आणि हान यिनान हा संघ अंतिम फेरीत गेला. भारतीय संघाचे ६२९.५ इतके एकूण गुण मिळवले होते. तर चीनच्या एका संघाने ६३०, तर दुसऱ्या संघाने ६३२.३ गुण मिळवले होते.
शांभवीने अनुक्रमे १०५.४, १०५.२ आणि १०४.४ अशी कामगिरी केली. प्रणवने १०३.७ पासून सुरुवात केली. पुढे त्याने १०५.७ आणि १०५.१ असे गुण मिळवले. स्पर्धेत सहभागी असलेल्या इशा टाकसाळे आणि हिमांशू या अन्य भारतीय जोडीने ६२८.६ गुणांसह चौथे स्थान मिळवले. शांभवीसाठी हे दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी तिने कोंडूर आणि इशा अनिल यांच्यासह महिला ज्युनियर १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत १८९६.२ गुणांसह ज्युनियर वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवत सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, भारतीय जोडीच्या या यशस्वी चाहत्यांकडून कामगिरीबाबत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शांभवी-नरेन अव्वल
शांभवी श्रवण आणि नरेन प्रणव यांनी ज्युनियरमध्ये १० मीटर एअर रायफल मिश्र गटात सोनेरी यश मिळवले. त्यांनी चीनच्या संघाला १६-१२ असे पराभूत करून हे यश संपादन केले.