दोहा : भारताचा अव्वल ग्रँडमास्टर अर्जुन इरिगसी याने माजी विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याला पराभवाचा धक्का देत जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अग्रस्थानी झेप घेतली आहे.
अर्जुन एरिगसीने नॉर्वेच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कार्लसनला पराभूत केल्यानंतर पुढच्या डावात उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह याचा पाडाव केला आणि पुढील तीन लढती बरोबरीत सोडवत संयुक्तपणे अग्रस्थान प्राप्त केले. पहिल्या दिवसअखेर एरिगसीने १३ डावात १० गुण मिळवत मॅक्झिम वचिएर-लॅग्रेव्ह आणि अमेरिकेचा ग्रँडमास्टर फॅबियानो कारूआना यांच्यासह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे.
कार्लसनविरुद्धच्या डावात अर्जुन एरिगसीकडे फक्त नऊ सेकंद बाकी असताना, कार्लसनकडून वजीराची चाल खेळण्यात आली, पण त्याचा वजीर खाली पडला. कार्लसनने तत्काळ आपली सोंगडी पुन्हा पटावर मांडण्याचा प्रयत्न केला. पण फक्त तीन सेकंद त्याच्याकडे शिल्लक असल्यामुळे या प्रयत्नात तो वेळ वाया गेला. अखेर त्याला हार पत्करावी लागली. या परिस्थितीनंतर कार्लसनने नैराश्येत टेबलावर हाताने जोरदार प्रहार केला. याआधीही भारताच्या डी. गुकेशकडून हरल्यानंतर कार्लसनने बाकड्यावर जोरात प्रहार केला होता. आता कार्लसन आणि इयान नेपोमनियाची हे संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत.
आता मंगळवारी रात्री पुढील सहा फेऱ्या खेळवण्यात येणार असून त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरीची लढत खेळवण्यात येईल. कार्लसन आपल्या नवव्या जागतिक ब्लिट्झ जेतेपदासाठी उत्सुक असला तरी पिछाडीवर पडल्यामुळे त्याच्या उपांत्य फेरीच्या आशा काहीशा मावळल्या आहेत. मात्र कधीही हार न मानण्याच्या वृत्तीमुळे आता त्याला पुढील फेऱ्यांमध्ये दमदार खेळ करावा लागणार आहे.
हम्पी, दिव्याची घसरण
दोन वेळा जागतिक रॅपिड स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी कोनेरू हम्पी हिला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. रॅपिड प्रकारात रविवारी कांस्यपदक पटकावणाऱ्या हम्पीला ब्लिट्झ प्रकारात मात्र दमदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे १०व्या फेरीअखेर तिची पाच गुणांनिशी ६१व्या स्थानी घसरण झाली आहे. ३८ वर्षीय हम्पीला पाच डावांत पराभव पत्करावा लागला. महिला विश्वविजेती दिव्या देशमुख हिला ६ गुणांसह ३०व्या क्रमांकावर मजल मारता आली. ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हरिका आणि आर. वैशाली या ५.५ गुणांसह तिच्या पाठोपाठ आहेत. डचची आंतरराष्ट्रीय मास्टर एलिन रोबर्स हिने ८.५ गुणांसह महिलांमध्ये अग्रस्थान पटकावले आहे. मंगळवारी आणखी पाच फेऱ्या खेळवण्यात येणार असून अव्वल चार खेळाडू उपांत्य फेरीत दाखल होतील.