लास वेगास : भारताचा उदयोन्मुख ग्रँडमास्टर आणि जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या अर्जुन इरिगेसीने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. फ्री-स्टाईल ग्रँडस्लॅम टूर बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा अर्जुन हा पहिलाच भारतीय ठरला. या स्पर्धेतील विजेत्याला ७,५०,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस देण्यात येणार आहे.
बुद्धिबळातील माजी जगज्जेता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि जर्मनीचे विख्यात उद्योजक जॅन हेन्रिक यांनी एकत्रितपणे संपूर्ण वर्षभर रंगणाऱ्या या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत एकूण चार टप्पे असून केपटाऊन येथे डिसेंबरमध्ये अंतिम फेरी रंगणार आहे. आतापर्यंत जर्मनी (७ ते १४ फेब्रुवारी), फ्रान्स (७ ते १४ एप्रिल), जर्मनी (१७ ते २१ एप्रिल) या ठिकाणी स्पर्धेचे तीन टप्पे (लेग) पार पडलेले आहेत. २० जुलैपर्यंत लास वेगास येथे चौथा टप्पा सुरू राहणार आहे. एकंदर १६ खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत आजवर भारताचा एकही स्पर्धक उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेला नव्हता. मात्र २१ वर्षीय अर्जुनने हा पराक्रम करून दाखवला.
अर्जुनने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या उझबेकिस्तानच्या नोदिब्रेक अब्दुसात्रोव्हला १.५-०.५ असे एका गुणाच्या फरकाने पराभूत केले. अर्जुनने पहिला जलद गेम सहज जिंकला, तर दुसऱ्या गेममध्ये बरोबरी राखली. आता उपांत्य फेरीत अर्जुनची अमेरिकेच्या लेव्हॉन अरोनियनशी गाठ पडेल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमेरिकेचा फॅबियानो कारुआना आणि मोक निमॅन आमनेसामने येतील. अर्जुनने साखळीत ४ गुण मिळवले होते, तर प्रज्ञानंदने ४.५ गुण. मात्र उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंद कमी पडला. आता अर्जुनवर भारतीयांच्या आशा टिकून आहेत.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत भारताने बुद्धिबळात झपाट्याने प्रगती केली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे दुहेरी जेतेपद मिळवल्यानंतर डिसेंबरमध्ये डी. गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत जिंकून जगज्जेतेपद काबिज केले. गुकेश सध्या या स्पर्धेत सहभागी झालेला नसला, तरी त्याने काही दिवसांपूर्वीच कार्लसनलाही धूळ चारली होती. महिलासुद्धा यामध्ये मागे नाहीत. त्यामुळे एकूणच बुद्धिबळात भारतीयांची कामगिरी उल्लेखनीय होत आहे.
ग्रँडस्लॅम टूरबाबत थोडक्यात
टेनिसमध्ये ज्याप्रमाणे चार ग्रँडस्लॅम स्पर्धा असतात, त्याप्रमाणेच आता बुद्धिबळात चार टप्प्यांत ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. फिडेकडून या स्पर्धेला अधिकृत मान्यता नसली, तर बुद्धिबळ विश्वात या स्पर्धेला अल्पावधित महत्त्व प्राप्त झाले आहे.
२०२४मध्ये ‘फ्री-स्टाईल चेस गोट’ या नावाने ही स्पर्धा खेळवण्यात आली. मात्र यावेळी तिचे चार टप्प्यांत वर्गीकरण करण्यात आले. या चारही फेऱ्यांनंतर सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दोन बुद्धिबळपटूंमध्ये वर्षाखेरीस अंतिम फेरी रंगणार आहे.
१६ खेळाडूंची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून दोन्ही गटांतील आघाडीचे चार जण उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले.
आतापर्यंतच्या तीन टप्प्यांत कार्लसनने दोन वेळा, तर एका टप्प्यात जर्मनीच्या व्हिन्सेंट केमारने जेतेपद मिळवले.
प्रज्ञानंदचा कार्लसनला धक्का; तरीही स्पर्धेबाहेर
भारताचा १९ वर्षीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कार्लसनला धक्का दिला होता. मात्र दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाकडून प्रज्ञानंदला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याची गुणतालिकेत घसरण झाली असून तो जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. कारुआनाने प्रज्ञानंदला ४-३ असे नमवले. त्याशिवाय विदित गुजराथीचे आव्हान संपुष्टात आले. दरम्यान, या स्पर्धेत प्रेक्षकांच्या आवाजामुळे लक्ष विचलित होऊ नये, यासाठी बुद्धिबळपटूंना हेडफोन घालण्याची परवानगीही देण्यात आली आहे.