
नवी दिल्ली : पाकिस्तानचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू अर्शद नदीमने नीरज चोप्रा (एनसी) क्लासिक स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. पहलगाम येथे झालेल्या भारतीय नागरिकांवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नदीमने नकार दर्शवल्याचे समजते. मात्र यामुळे समाज माध्यमांवर नीरजवरही टीका करण्यात येत आहे.
भारताचा दोन ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू नीरजने ही स्पर्धा सह-आयोजित केली असून त्यात खेळण्यासाठी नदीमला त्याने वैयक्तिक आमंत्रण दिले होते. मात्र, प्रशिक्षण कार्यक्रमामुळे आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही, असे नदीमने कळवले आहे. “नीरज चोप्राची स्पर्धा २४ मे रोजी होणार आहे आणि मी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीसाठी २२ मेपासून कोरियात जाणार आहे. माझ्यासाठी आशियाई स्पर्धा खूप महत्त्वाची आहे,” असे नदीमने म्हटले आहे. आशियाई स्पर्धा २७ ते ३१ मे या कालावधीत कोरियात गुमी येथे होणार आहे.
दरम्यान, काहींनी नदीमला निमंत्रण दिल्याने काहींनी नीरजवर टीका केली होती. यामागील कारण स्पष्ट करताना नीरजने त्याचे मत मांडले. नदीमला फक्त एक खेळाडू म्हणून आमंत्रण दिले होते. यामुळे माझ्या अथवा माझ्या कुटुबियांच्या देशभावनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे फारच क्लेशदायी आहे, असे नीरजने शुक्रवारी ट्वीट केले. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
पाकिस्तानी खेळाडूंमुळे सॅफ स्पर्धा लांबणीवर
भारतात होणारी दक्षिण आशियाई (सॅफ) वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा सात महिन्यांत दुसऱ्यांदा पुढे ढकलण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. यामागील कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळण्याबाबत अडचणी येत असल्यामुळेच स्पर्धा लांबणीवर पडल्याचे समजते. ही स्पर्धा ३ ते ५ मे या कालावधीत रांची येथील बिसरा मुंडा ॲथलेटिक्स मैदानावर रंगणार होती. मात्र, आता ती जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार सुरुवातील ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ मध्ये पार पडणार होती. मात्र, स्पर्धेच्या काही दिवस आधीच ती पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. या स्पर्धेचे हे चौथे पर्व असून, स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि मालदीव या देशांतील धावपटूंचा सहभाग अपेक्षित आहे. विशेष म्हणजे भूतानचा संघ स्पर्धेसाठी भारतात दाखल झाला असून, त्यांनी रांची येथे सरावालाही सुरुवात केली आहे. दुसऱ्यांदा स्पर्धा रद्द करण्याचे कारण जाहीरपणे दिले जात नसले, तरी पाकिस्तानच्या ४३ सदस्यीय संघाला व्हिसा मिळण्यास होत असलेल्या उशिरामुळेच हा निर्णय घेण्यात आला असावा असे म्हटले जात आहे.