पर्थ : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या प्रतिष्ठित ॲशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा शनिवारी दुसऱ्या दिवशीच निकाल लागला. वेगवान गोलंदाजांनी दुसरा डावातही केलेल्या चमकदार कामगिरीला ट्रॅव्हिस हेडच्या तुफानी शतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ८ गडी राखून धुव्वा उडवत पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
१८८२-८३ पासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेस 'अॅशेस' असे संबोधले जाते.
२०२३मध्ये इंग्लंड येथे अखेरची अॅशेस मालिका झाली होती. त्यामध्ये दोन्ही संघांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे तूर्तास ऑस्ट्रेलियाकडे अॅशेस करंडक आहे. कारण २०२१-२२मध्ये त्यांनी मायदेशात ही मालिका जिंकली होती. आता चार वर्षांनी पुन्हा एकदा कांगारूंना मायदेशात अॅशेसवरील वर्चस्व अबाधित राखण्याची संधी आहे. पर्थ येथे पहिली कसोटी झाल्यावर ४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे दुसरी, १७ डिसेंबरपासून अॅडलेडला तिसरी, २६ डिसेंबरपासून मेलबर्नला चौथी, तर ४ जानेवारीपासून सिडनीला पाचवी कसोटी खेळवण्यात येईल.
दरम्यान, उभय संघांतील पहिल्या कसोटीत शुक्रवारी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात १७२ धावांत गारद झाला. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ९ बाद १२३ अशी स्थिती होती. दुसऱ्या दिवसातील सातव्याच षटकांत ब्रेडन कार्सने नॅथन लायनचा बळी मिळवून कांगारूंचा पहिला डाव ४५.२ षटकांत १३२ धावांत गुंडाळला. त्यामुळे इंग्लंडला पहिला डावात ४० धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजीकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती. लंच ब्रेकला ते एक बाद ५९ अशा सुस्थितीत होते. मात्र दुसऱ्या सत्रात मिचेल स्टार्क, स्कॉट बोलंड आणि डॉगेट यांनी भेदक मारा करून इंग्लंडला ३४.४ षटकात १६४ धावांत गारद केले. बेन डकेट (२८), ओली पोप (३३) आणि अॅटकिन्सन (३७) यांनी कडवा प्रतिकार केला. मात्र विकेट जात असतानाही आक्रमक फलंदाजी करणे इंग्लंडला महागात पडले. इंग्लंडने विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले. मग हेडच्या तुफानी शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २८.२ षटकात विजयी लक्ष्य गाठले. हेडने १६ चौकार व चार षटकारांसह ८३ चेंडूंत १२३ धावा फटकावल्या.