

मेलबर्न: अखेर अपेक्षेप्रमाणे इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या ॲशेस कसोटीचा खेळ दोन दिवसांतच खल्लास झाला. वेगवान गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही केलेल्या प्रभावी गोलंदाजीला इंग्लंडने संयमी फलंदाजी करत उत्तम साथ दिली. त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियाला ४ गडी राखून पराभूत केले. १५ वर्षांत प्रथमच इंग्लंडने ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र मालिकेत ऑस्ट्रेलियाच ३-१ अशी आघाडीवर आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या 'बॉक्सिंग डे' लढतीत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात ३४.३ षटकांत १३२ धावांत गुंडाळल्यावर इंग्लंडपुढे विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. मात्र झंक क्रॉली (३७), बेन डकेट (३४) यांच्या सलामीसह जेकब बेथल (४०) यांनी आव्हानात्मक खेळपट्टीवर आक्रमक खेळ केला. त्यामुळे इंग्लंडने ३२.२ षटकांत सहा फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठल. हरी ब्रूक (नाबाद १८) व जेमी स्मिथ (नाबाद २) यांनी इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तर लढतीत एकूण ७ बळी मिळवणारा वेगवान गोलंदाज जोश टंग सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयामुळे कर्णधार बेन स्टोक्स व प्रशिक्षक बँडन मॅकलम यांच्यावर सातत्याने होणारी टीका काहीशी कमी झाली आहे.
उभय संघांतील या लढतीत पहिल्याच दिवशी २० बळी गारद झाले होते. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५२ धावांत आटोपल्यावर इंग्लंडचा संघही ११० धावांतच गारद झाला. मग दुसऱ्या डावात बिनबाद ४ अशी स्थिती असताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाला प्रारंभ केला. परंतु ब्रेडन कार्स (३४ धावांत धावांत ४ बळी), बेन स्टोक्स (२४ धावांत ३ बळी) व टंग (४४ धावांत २ बळी) या वेगवान त्रिकुटाने अफलातून मारा केला. जेक वेदराल्ड (५), मार्नस लबूशेन (८), उस्मान ख्वाजा (०), कॅरी (४) यांनी निराशा केली. ट्रेव्हिस हेड (४६) व कर्णधार स्टीव्ह स्मिथ (नाबाद २४)यांनी काहीसा प्रतिकार केला. मात्र पहिल्या डावातील ४२ धावांच्या आघाडीनंतरही ऑस्ट्रेलिया इंग्लंडपुढे १७५ धावांचेच लक्ष्य ठेवू शकली. ऑस्ट्रेलियाकडूनही मिचेल स्टार्क, बोलंड व झाय रिचर्डसन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत रंगत निर्माण केली होती. मात्र इंग्लंडने यावेळी अतिआक्रमकपणा टाळून लक्ष्य गाठले. आता ३ जानेवारीपासून उभय संघांतील पाचवी कसोटी सिडनी येथे खेळवण्यात येईल.
दरम्यान, १८८२-८३ पासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेस ॲशेस असे संबोधले जाते. २०२३मध्ये इंग्लंड येथे अखेरची अॅशेस मालिका झाली होती. त्यामध्ये दोन्ही संघांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. यावेळी ऑस्ट्रेलियाने पहिले तीन सामने जिंकून आघाडी घेतली. त्यामुळे अॅशेस करंडक ऑस्ट्रेलियाकडेच राहणार आहे. आता चौथ्या कसोटीत इंग्लडंने बाजी मारली. २०११मध्ये सिडनी येथे त्यांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची कसोटी जिंकली होती. त्यानंतर ५,४६८ दिवस त्यांना या विजयाची प्रतीक्षा करावी लागली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १५२
इंग्लंड (पहिला डाव): ११०
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव): ३४.३ षटकांत सर्व बाद १३२ (ट्रेव्हिस हेड ४६, स्टीव्ह स्मिथ नाबाद २४; ब्रेडन कार्स ४/३४)
इंग्लंड (दुसरा डाव) : ३२.२ षटकांत ६ बाद १७८ (जेकब बेथल ४०, सॅक क्रॉली ३७; झाय रिचर्डसन २/२२)
सामनावीर - जोश टंग