

आसान: भारताच्या अश्मिता चालिहा हिने कोरिया मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत आपली प्रभावी घौडदौड कायम राखत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या थरारक लढतीत २६ वर्षीय अश्मिताने भारताच्याच १९ वर्षीय रशिता रामराज हिचा २१-१३, १६-२१, २१-१३ असा पराभव केला. अश्मिताच्या कारकीर्दीतील 'बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर'ची ही पहिलीच अंतिम फेरी ठरली आहे.
उजव्या पायाच्या दुखापतीमुळे तीन महिने मैदानापासून दूर राहिल्यानंतर मे महिन्यात पुनरागमन करणाऱ्या अश्मिताने या मोसमात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. जागतिक क्रमवारीतील व्या ५० क्रमांकावरील अश्मिता ही गुवाहाटी येथील 'राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात' पार्क ताए-संग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. अंतिम फेरीत तिची गाठ चौथ्या मानांकित आणि जागतिक क्रमवारीत ३५ व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान च्यांशी हिच्याशी पडणार आहे.
उपउपांत्य फेरीत जपानच्या अग्रमानांकित हिना अकेचीला नमवणाऱ्या अश्मिताने उपांत्य फेरीतही आक्रमक सुरुवात केली. पहिला गेम अश्मिताने २१-१३ असा सहज जिंकला. मात्र, पुलेला गोपीचंद अकादमीची प्रशिक्षणार्थी असलेल्या रशिताने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करत अश्मितावर १३-६ अशी आघाडी घेतली व नंतर २१-१६ असा गेम जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये अश्मिताने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करत ११-३ अशी मोठी आघाडी घेतली आणि शेवटी ४८ मिनिटांत सामना जिंकला.
भारतीय बॅडमिंटनपटूंची दमदार कामगिरी सुरूच
चालू मोसमात भारतीय बॅडमिंटनपटूंनी सातत्याने विविध स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तन्वी शर्माने गेल्या रविवारी तैपेई ओपन जिंकले होते. त्याशिवाय आयुष शेट्टी (आशिया चॅम्पियनशिप), लक्ष्य सेन (ऑल इंग्लंड), देविका सिहाग (यूएस ओपन), पी. व्ही. सिंधू (जपान (थायलंड मास्टर्स), किदाम्बी श्रीकांत ओपन) आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी (सिंगापूर ओपन) यांनीही यंदाच्या मोसमात फायनल गाठली आहे.