कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : अश्मिता अजिंक्य! कारकीर्दीतील पहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद

भारताच्या अश्मिता चलिहाने रविवारी कोरिया मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद काबिज केले. २६ वर्षीय अश्मिताने कारकीर्दीतील पहिलेच बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावताना चीनच्या चौथ्या मानांकित हॅन कियानला धूळ चारली.
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : अश्मिता अजिंक्य! कारकीर्दीतील पहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : अश्मिता अजिंक्य! कारकीर्दीतील पहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद
Published on

नवी दिल्ली : भारताच्या अश्मिता चलिहाने रविवारी कोरिया मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद काबिज केले. २६ वर्षीय अश्मिताने कारकीर्दीतील पहिलेच बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावताना चीनच्या चौथ्या मानांकित हॅन कियानला धूळ चारली.

आसामच्या अश्मिताने ५३ मिनिटे चाललेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत ३५व्या स्थानी असलेल्या हॅन हिचा १४-२१, २१-१४, २१-१४ असा पराभव केला. दोन वर्षांपूर्वी कोरियामध्येच उजव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर अश्मिताने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिला सेट गमावल्यानंतर अश्मिताने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये उत्कृष्ट पुनरागमन केले. ‘राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र’ गुवाहाटी येथे प्रशिक्षक पार्क ताए-संग यांच्या मार्गदर्शनाखाली अश्मिता सराव करते. पार्क यांनी यापूर्वी पी. व्ही. सिंधूला चार वर्षे मार्गदर्शन केले होते. त्यांच्याच मार्गदर्शनात सिंधूने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळेच पार्क यांचे मार्गदर्शन आता युवा खेळाडूंसाठीही मोलाचे ठरत आहे.

अश्मिताकडे कौशल्य आणि ताकद आधीपासूनच होती, मात्र तिच्या खेळात सातत्य आणणे आवश्यक होते, असे प्रशिक्षक पार्क ताए-संग यांनी सांगितले. २०२४च्या कोरिया ओपनदरम्यान अश्मिताच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर शस्त्रक्रिया आणि प्रदीर्घ पुनर्वसनानंतर तिने फेब्रुवारीमध्ये पुनरागमन करत १४ स्पर्धांमध्ये भाग घेतला. या वर्षी तिने चीन मास्टर्स व मलेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत, तर मकाऊ ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यापूर्वी पार्क आणि अश्मिता यांनी हानच्या खेळाचे व्हिडीओ विश्लेषण करून स्वतःच्या चुका कमी करण्यावर भर दिला.

अंतिम सामन्यातील पहिल्या सेटमध्ये अश्मिताने ३-० आणि ९-५ अशी आघाडी घेतली होती, मात्र हॅनने ११-११ अशी बरोबरी साधत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये अश्मिताने आक्रमक खेळ करत ११-८ अशी आघाडी घेतली आणि २१-१४ असा सेट जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये मध्यांतरापर्यंत हान ११-९ ने पुढे होती, परंतु अश्मिताने सलग गुण घेत १५-११ अशी भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर तिने क्रॉस-कोर्ट आणि अचूक फटकेबाजी करत २१-१४ असा अंतिम सेट आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.

एकूणच तन्वी, अश्मिता यांच्या या कामगिरीमुळे भारताला महिला एकेरीत भविष्याच्या दृष्टीने उत्तम खेळाडू गवसल्याची खात्री पटली आहे.

आता जागतिक स्पर्धेची उत्सुकता

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान यंदा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील आठवडा बॅडमिंटनपटूंना विश्रांती असून आता जागतिक स्पर्धेची क्रीडाप्रेमींना उत्सुकता लागली आहे. अश्मिता या स्पर्धेत सहभागी झालेली नसली, तरी भारताच्या अन्य खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा आहे. या स्पर्धेसाठी मानांकित खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महिला एकेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूला नववे मानांकन लाभले आहे. तसेच २०२२च्या आशियाई पदक विजेत्या सात्विकसाइराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीला पाचवे मानांकन देण्यात आले आहे. प्रत्येक प्रकारात भारताचे किमान दोन खेळाडू सहभागी झाले आहेत.

पहिल्या सेटमध्ये हवेच्या प्रवाहामुळे नियंत्रण राखणे कठीण गेले, परंतु दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये नियंत्रण मिळवत रणनीती बदलली आणि विजय मिळवता आला. हे जेतेपद खास आहे. यामुळे भविष्यात कामगिरी उंचावण्यासाठी प्रेरणा मिळेल.

अश्मिता चलिहा

गेल्या रविवारी तन्वी शर्माने तैपेई ओपन जिंकली, तर आता अश्मिताने कोरिया मास्टर्समध्ये बाजी मारली. त्यामुळे भारतीय खेळाडूने सलग दुसऱ्या आठवड्यात बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरचे विजेतेपद मिळवले आहे. अश्मिताने २०१९च्या दक्षिण आशियाई स्पर्धेत महिला एकेरी तसेच सांघिक प्रकारातही सुवर्णपदक पटकावले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in